चंदगड, आजरा व गडहिंग्लजच्या वाहतूक सेवेला नवे बळ.
चंदगड प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.
चंदगड बस डेपोमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या पाच नवीन बसांपैकी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झालेल्या तीन नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस आजपासून चंदगडकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उर्वरित दोन बस ची प्रक्रिया पूर्ण होताच त्या देखील लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन तालुक्यांसाठी या नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांना दर्जेदार, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने त्यांनी परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यालाच आता यश मिळाले असून या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
या नव्या बसांमुळे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला यामुळे नवे बळ मिळणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
या नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसांचे पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. भरमूअण्णा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मा. शांताराम बापू पाटील, नगराध्यक्ष मा. सुनील काणेकर, उपनगराध्यक्ष मा. सौ. आरेशा नायकवाडी, डेपो व्यवस्थापक मा. सतीश पाटील, माजी जि.प. सदस्य मा. सचिन बल्लाळ, चंदगड मंडळ अध्यक्ष मा. विशाल बल्लाळ, मा. सुरेश सातवणेकर, मा. अशोक गाडदे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्षा मा. सौ. भारती जाधव, मा. विष्णू गावडे, डॉ. परशराम गावडे तसेच अन्य मान्यवर, चंदगड बस डेपोचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार परिवहन सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. नवीन बसांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



