जॉर्डन गोन्साल्विस यांच्याकडून भाजपला ‘घरचा आहेर’!
खानापुरातील बेरोजगारी, व्यसनाधीनतेवर भाजप अल्पसंख्याक सेल अध्यक्षांचा थेट निशाणा; मोठा उद्योग उभारण्याची मागणी
खानापूर : राजू कुंभार
खानापूर तालुक्यात विकासाचे दावे आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यावरून राजकीय चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच तालुक्यातील बेरोजगारी, वाढती व्यसनाधीनता आणि शेतीसमोरील संकट याकडे लक्ष वेधत मोठ्या उद्योगाची मागणी केल्याने पक्षाच्या स्थानिक आमदारांसमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे.
भाजप अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष जॉर्डन गोन्साल्विस यांनी उत्तर कन्नडचे भाजप खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना निवेदन देत खानापूर तालुक्यात सुमारे २ हजार ते ३ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा मोठा उद्योग अथवा कारखाना सुरू करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना खुद्द तालुक्याचे माजी अध्यक्ष संजय कुबल, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी हे देखील उभे आहेत त्यामुळे गोन्साल्विस यांच्या मागणीला त्यांचादेखील बाहेरून पाठिंबा आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.
‘तरुणांच्या हाताला काम कुठे?’; निवेदनातून व्यवस्थेवर सवाल
गोन्साल्विस यांच्या निवेदनात तालुक्यात मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. रोजगाराच्या संधीअभावी अनेक तरुण मानसिक तणावाला सामोरे जात असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
त्याचबरोबर काही तरुण दारू, जुगार आणि इतर व्यसनांच्या आहारी जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये निराशा वाढत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला असून, काही जण टोकाचे पाऊल उचलण्याच्या परिस्थितीत पोहोचत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेती संकटात; मग तरुणांनी करायचे काय?
खानापूर तालुक्यात पावसाअभावी शेतीवर परिणाम झाल्याचे सांगत निवेदनात भात आणि ऊस पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शेती संकटात आणि औद्योगिक रोजगाराच्या संधी मर्यादित असतील, तर ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराचा पर्याय नेमका कुठे आहे, असा प्रश्न या मागणीमुळे पुढे आला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यानेच उपस्थित केला रोजगाराचा प्रश्न
विशेष म्हणजे, ही मागणी विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याकडून नव्हे, तर भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्याकडून करण्यात आल्याने या निवेदनाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यालाच जर तालुक्यात मोठा उद्योग आणण्यासाठी खासदारांकडे मागणी करावी लागत असेल, तर रोजगारनिर्मितीच्या बाबतीत आतापर्यंत काय झाले? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होण्याची शक्यता आहे.
विरोधकांना मिळणार मुद्दा?
खानापूरमध्ये बेरोजगारी, शेतीचे संकट आणि तरुणांमधील व्यसनाधीनता हे प्रश्न जर प्रत्यक्षात गंभीर असतील, तर त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक जोर धरू शकते. गोन्साल्विस यांच्या निवेदनामुळे विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मुद्दा मिळू शकतो.
मात्र या मागणीवर खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी तसेच भाजप आमदार विठ्ठल हलगेकर कोणती भूमिका घेतील , मोठ्या उद्योगासाठी प्रत्यक्ष प्रयत्न सुरू होतात का आणि रोजगारनिर्मितीबाबत ठोस पाऊल उचलले जाते का, याकडे आता खानापूरकरांचे लक्ष लागले आहे.
निवेदना पाठीमागे विठ्ठल होसूरकर, कारु लिमा, फिलिप रॉड्रिगस, मायकल आंद्रदे, रिचर्ड मेंनजिस आदींच्या सह्या आहेत
निवेदनातील आरोप आणि मागण्या यावर संबंधित भाजप नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यानंतर या प्रकरणाचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
Advertise



