गरिबीला हरवून सुप्रियाची भरारी;एकाच वेळी दोन शासकीय पदांना गवसणी.
गडहिंग्लज प्रतिनिधी :(संपत सावंत)
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थिती, शेतकरी कुटुंबाची आर्थिक विवंचना आणि मर्यादित साधन सुविधा या सर्व अडथळ्यांवर मात करत अपार कष्टाच्या बळावर औरनाळ (ता. गडहिंग्लज) ची सुकन्या कु.सुप्रिया वीरभद्र खानापुरे हिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाच वेळी दोन शासकीय पदांना गवसणी घातली आहे. तिची नाशिक महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे.

सुप्रियाचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. आई सौ. सुरेखा व वडील वीरभद्र हे तूटपुंज्या जमिनीवर शेती व मोल मजुरी करत मुलीच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतले. तिच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही.
सुप्रियाचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर औरनाळ येथे झाले. जागृती हायस्कूल गडहिंग्लज येथून सेमी इंग्रजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.आर. जुनियर कॉलेज मधून विज्ञान शाखेचे शिक्षण पूर्ण केले. संत गजानन,महागाव येथून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेत तिने सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे नेत्रदीपक यश मिळविले. तिने मिळवलेले यश केवळ दोन शासकीय पदावरील निवड नाही, तर ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा आणि आत्मविश्वासाचा किरण आहे.

गाव कितीही लहान असो, परिस्थिती कितीही आव्हानात्मक असो,मनात जिद्द, ध्येय आणि मेहनतीची तयारी असेल तर ‘आकाशाला कवेत घेता येते’ हे तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. तिच्या दैदिप्यमान यशामुळे ग्रामीण भागातील तरुणाईमध्ये नव्या आत्मविश्वासाची ज्योत पेटली असून “परिस्थिती नाही, तर कर्तुत्व भविष्य घडवते” असा प्रेरणादायी संदेश तिच्या यशातून मिळत आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.


