आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून पर्यटक ४०० फूट दरीत कोसळला.


लघुशंकेसाठी रेलिंग ओलांडताना दरीच्या भागात पाय घसरला; पावसामुळे शोधमोहीम स्थगित.

आंबोली (सावंतवाडी) प्रतिनिधी : स्वप्निल कुंभार

आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंट परिसरात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. आयुब सय्यद (वय ४६, रा. जत्राट, ता. निपाणी) असे संबंधित पर्यटकाचे नाव असून, ते व्यवसायाने डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, आयुब सय्यद हे त्यांच्या अन्य नऊ सहकाऱ्यांसह आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. परतीच्या प्रवासापूर्वी लघुशंकेसाठी त्यांनी सुरक्षा रेलिंग ओलांडून दरीकडील बाजूस जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाय घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते थेट खोल दरीत कोसळले.

घटनेवेळी परिसरात मक्याची कणसे विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर सय्यद यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मागदूम व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला. त्यानंतर सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम, आंबोली-सांगेली यांना पाचारण करण्यात आले. रेस्क्यू पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, अंधार पडणे, सतत सुरू असलेला पाऊस आणि धूसर हवामानामुळे रात्री शोधकार्य थांबविण्यात आले.

रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे २०० फूट पुढील जंगल परिसरातील दरीत कोसळल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, बुधवारी पहाटे उजाडताच रेस्क्यू पथक आणि पोलिसांच्या उपस्थितीत शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


0
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!