ऐनापुरात शस्त्रांच्या धाकावर चोरीचा प्रयत्न; ग्रामस्थांच्या सतर्कतेने डाव उधळला


महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला; चोरटे दुचाकीवरून पसार, पोलिसांकडून तपास सुरू.

ऐनापूर (ता. गडहिंग्लज) : श्री. स्वप्निल कुंभार.

ऐनापूर येथे रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शस्त्रांच्या धाकावर घरफोडी व लुटीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. मात्र, घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे आणि ग्रामस्थांच्या तात्काळ मदतीमुळे चोरट्यांचा डाव फसला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण दड्डीकर यांच्या घरी रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी दरवाजा ठोठावत आवाज दिला. घरातील कल्पना दड्डीकर यांनी दरवाजा उघडताच, एका संशयिताने त्यांच्या गळ्याला हात घालून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धैर्याने प्रतिकार करत चोरट्यांशी झटापट केली.

प्रसंगावधान राखत कल्पना दड्डीकर यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक आणि रात्री गस्त घालत असलेले युवक तातडीने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांची चाहूल लागताच दोन्ही चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने पळ काढला. त्यानंतर त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून इंचनाळच्या दिशेने पलायन केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

झटापटीदरम्यान कल्पना दड्डीकर यांच्या हाताला दुखापत झाली असून रक्तस्राव झाल्याची माहिती आहे. चोरट्यांच्या हातात धारदार चाकू, कोयता यांसारखी शस्त्रे असल्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. योग्य वेळी आरडाओरड झाली नसती, तर चोरीसोबत गंभीर जीवितहानी किंवा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा गावात सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच ऐनापूरचे माजी उपसरपंच पिंटू उर्फ निवृत्ती मांगले यांनी तात्काळ गडहिंग्लज पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व प्राथमिक चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


0
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!