कोनेवाडी बंधाऱ्यात बुडून १४ वर्षीय बालकाचा मृत्यू; चंदगड तालुक्यात हळहळ.


खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पृथ्वीराजचा दुर्दैवी अंत; कुटुंबावर शोककळा

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

कोनेवाडी (ता. चंदगड) येथील बंधाऱ्यात पाण्यात पडून बुडाल्याने पृथ्वीराज तुकाराम गावडे (वय १४, रा. चवाड गल्ली, नागणवाडी, ता. चंदगड) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार (दि. २१ नोव्हेंबर) रोजी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे नागणवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत चंदगड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण तुकाराम गावडे (वय ६५) हे नातू पृथ्वीराज याच्यासोबत नागणवाडी येथील बाग नांगरण्यासाठी शेताकडे गेले होते. यावेळी पृथ्वीराज हा आपल्या मित्रांसोबत कबड्डी खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून तेथून निघून गेला. दरम्यान, दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण गावडे हे शेतात असताना नंदकुमार मारुती गावडे यांनी त्यांना पृथ्वीराज कोनेवाडी बंधाऱ्यातील पाण्यात पडून बुडाल्याचे सांगितले.

माहिती मिळताच फिर्यादी व नातेवाईकांनी तातडीने बंधाऱ्याकडे धाव घेतली. तेथे उपस्थित मुलांनी पाण्यातून पृथ्वीराजला बाहेर काढले होते. त्यानंतर त्याला तातडीने खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय, चंदगड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार १३४९ पाटील यांनी प्राथमिक तपास केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!