म्हादई पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला पुन्हा ब्रेक


म्हादई पाणी वळविण्याच्या प्रकल्पाला पुन्हा ब्रेक

बेळगावमधील ७१ एकर वनजमिनीचा प्रस्ताव केंद्राच्या प्रलंबित यादीतून बाहेर, स्पष्टीकरणांची प्रतीक्षा

राजू कुंभार: खानापूर

म्हादई (महादायी) नदीचे पाणी मलप्रभा खोऱ्यात वळविण्याच्या कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. बेळगाव जिल्ह्यातील ७१ एकर वनजमिनीचा वापर करण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्राकडे सादर केलेला वनमंजुरीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पांच्या यादीतून हटविला आहे. या प्रस्तावासंदर्भात मंत्रालयाने कर्नाटक सरकारकडून काही महत्त्वाची स्पष्टीकरणे मागितली असून, ती सादर होईपर्यंत हा प्रस्ताव पुढे सरकण्याची शक्यता धूसर झाली आहे.

म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पासाठी बेळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्राचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारकडून ७१ एकर वनजमिनीच्या वळणासाठी वनमंजुरीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत असून प्रकल्पाच्या यादीत समाविष्ट होता. मात्र, केंद्राने अचानक हा प्रस्ताव प्रतीक्षा यादीतून वगळल्यामुळे या प्रकल्पाच्या कार्यवाहीला खीळ बसली आहे.

केंद्रीय वन मंत्रालयाने प्रस्तावातील काही बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत किंवा आवश्यक तपशील अपूर्ण असल्याने कर्नाटक सरकारकडे स्पष्टीकरण मागितल्याची माहिती समोर येत आहे. वनजमिनीचा वापर, पर्यावरणीय परिणाम, प्रकल्पाची गरज आणि आवश्यक वैधानिक मंजुरी किंवा कागदपत्रे यांसारख्या मुद्द्यांवर केंद्राकडून स्पष्टीकरण मागितले गेले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक सरकारकडून या स्पष्टीकरणांना समाधानकारक उत्तर दिल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील.

म्हादई पाणी वाटपाचा वाद कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये दीर्घकाळापासून सुरू आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्यातील जैवविविधता, पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होईल, अशी भूमिका गोव्याने सातत्याने घेतली आहे. दुसरीकडे, कर्नाटकातील दुष्काळग्रस्त आणि मलप्रभा खोऱ्यातील भागांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

अशा पार्श्वभूमीवर, ७१ एकर वनजमिनीचा प्रस्ताव प्रलंबित यादीतून बाहेर काढल्याने कर्नाटकच्या हालचालींना तात्पुरता ब्रेक लागला आहे. येत्या काळात कर्नाटक सरकार केंद्रीय मंत्रालयाने विचारलेल्या स्पष्टीकरणांवर नेमका काय अहवाल सादर करते आणि त्यानंतर केंद्राची भूमिका काय राहते, याकडे आता संपूर्ण राज्यासह शेजारील राज्यांचेही लक्ष लागलेआहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!