मठ गल्लीतील तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्य धोक्यात;


नंदगड मठ गल्लीतील तुंबलेल्या गटारींमुळे आरोग्य धोक्यात

ग्रा.पं च्या नाकर्तेपणाविरोधात माजी जि. पं सदस्य कारलगेकर यांचा संताप

राजू कुंभार: खानापूर

नंदगड येथील मठ गल्ली परिसरातील गटारी घाण, प्लॅस्टिकचा कचरा, गाळ आणि दूषित पाण्याने तुंबल्या असून, प्रशासनाच्या ‘अर्थपूर्ण’ व ‘सोयीस्कर’ उदासीनतेमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे डेंगीसह इतर डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला असून, लहान मुलांसह नागरिकांना तापाची बाधा होत आहे. मूलभूत स्वच्छतेकडेही ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, अखेर नाइलाजाने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत श्रमदानातून गटारींची स्वच्छता सुरू केली आहे. प्रशासनाच्या या निष्क्रिय कार्यपद्धतीवर माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सध्या परिसरात थंडीचा कडाका जाणवत असला, तरी गटारीत साचलेला काळा गाळ, प्लॅस्टिकचा कचरा, गवत आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या व तुंबलेल्या गटारीतून पसरणारी असह्य दुर्गंधी आणि साचलेले दूषित पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरत आहे. याचा थेट परिणाम परिसरातील लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य व स्वच्छता यंत्रणा मात्र ‘गाढ झोपेत’ असल्याचे चित्र आहे.

 

छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येते की, एका नागरिकाने हातात अवजार आणि घमेले घेऊन गटारीतील गाळ व कचरा उपसण्याचे काम स्वतः सुरू केले आहे. गटारीच्या कडेला वाढलेले गवत, साचलेला काळा गाळ आणि कचरा पाहता, रस्ता व गटारीच्या हद्दीवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने करायचे काम जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना हातात अवजार घेऊन करावे लागते, तेव्हा ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरेच वेशीवर टांगली गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येकडे ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वेळेवेळी तोंडी आणि लेखी स्वरूपात वारंवार तक्रारी करूनही स्वच्छतेसाठी कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. “जर ग्रामपंचायत प्रशासन मूलभूत स्वच्छतेकडेच लक्ष देणार नसेल, तर ग्रामपंचायतीला कर भरून नेमका काय फायदा?” असा संतप्त आणि रोखठोक सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांनी स्वतः श्रमदान करून आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला असला, तरी केवळ श्रमदानावर अवलंबून न राहता प्रशासनाने तातडीने गटारींची नियमित साफसफाई, गाळ काढणे आणि डास नियंत्रणासाठी औषध फवारणी करावी, अशी जोरदार मागणी मठ गल्लीतील नागरिकांमधून होत आहे. अन्यथा, येत्या काळात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला जातआहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!