शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी भेट; १०० कोटींची ‘मुख्यमंत्री कृषी विस्तार’ योजना जाहीर
मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जावरील २३६ कोटींचे व्याज माफ
राजू कुंभार: खानापूर
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतीला फायदेशीर उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी कर्नाटक मंत्रिमंडळाने ‘मुख्यमंत्री कृषी विस्तार योजना’ राबवण्यास मंजुरी दिली आहे. पुढील ३ वर्षांत १०० कोटी रुपये खर्च करून ही योजना राबवली जाणार असून, राज्यातील १० हजार शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यासोबतच गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्गीय विकास महामंडळांच्या थकीत कर्जावरील तब्बल २३६.०४ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे.
काय आहे ‘मुख्यमंत्री कृषी विस्तार योजना’?
आतापर्यंत शेतीमध्ये केवळ पीक उत्पादन वाढवण्यावर अधिक भर दिला जात होता. मात्र, आता उत्पादनासोबतच मूल्यवर्धन (Value Addition), प्रक्रिया उद्योग आणि फायदेशीर कृषी उद्योगांना चालना देण्याचा शासनाचा मानस आहे.
निधी आणि लक्ष्य: ३ वर्षांत १०० कोटी रुपयांच्या निधीतून ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबवली जाईल. चालू आर्थिक वर्षात ३० कोटी रुपयांच्या अनुदानातून ५०० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य: कृषी आणि फलोत्पादन उत्पादनांवर प्रक्रिया करणे, उप-उत्पादने तयार करणे, पर्यायी कृषी उद्योग उभारणे, कृषी टाकाऊ पदार्थांचा वापर (Agri-waste utilization), कृषी पर्यटन (Agri-tourism) आणि बाजारपेठ जोडणीला प्रोत्साहन दिले जाईल.
कुणाला मिळणार लाभ: वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPO) संबंधित प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाईल. जिल्हानिहाय क्लस्टर-कॉरिडॉर निश्चित करून १० हजार शेतकरी कुटुंबांना मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.
मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जाचे २३६.०४ कोटींचे व्याज माफ:
मागासवर्गीय कल्याण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ७ विकास महामंडळांकडून २०१३-१४ ते २०२०-२१ या कालावधीत विविध योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
ज्या लाभार्थ्यांनी कर्जाची मूळ रक्कम (मुद्दल) पूर्णपणे परतफेड केली आहे, त्यांच्या कर्जावरील व्याज एकरकमी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या कर्जावरील एकूण २३६.०४ कोटी रुपयांचे व्याज माफ होणार आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत विविध महामंडळांनी वितरित केलेल्या कर्जाची एकूण थकीत मुद्दल ९७७.८१ कोटी रुपयेइतकी आहे.
Advertise

Advertise


