काटगाळी रस्त्याची धूळधांड; नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल!
ऊस वाहतुकीमुळे अपघातांची टांगती तलवार | ४ ते ५ फुटांच्या खड्ड्यांनी रस्त्याने गमावले अस्तित्व
राजू कुंभार: नागुर्डा
नागुर्डा-मोदेकोप रस्त्यापासून काटगाळी गावापर्यंत आणि तेथून पुढे देसूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड धूळधांड उडाली असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऊस हंगामामुळे या मार्गावर अवजड वाहतूक वाढणार असून, त्यामुळे अपघातांची टांगती तलवार निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याने पूर्णतः अस्तित्व गमावले असून, थेट चार ते पाच फूट रुंदीचे भलेमोठे खड्डे पडल्याने दुचाकी व चारचाकी वाहने मोडकळीस येत आहेत.
बेळगाव-खानापूरशी संपर्क धोक्यात

काटगाळी ग्रामस्थांचा दैनंदिन संपर्क खानापूरपेक्षा बेळगाव शहराशी अधिक आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी नागरिक व विद्यार्थ्यांची दररोज मोठी ये-जा असते. मात्र, प्रशासकीय कामासाठी नागुर्डा मार्गे खानापूरला जावे लागते नागुर्डा रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि शासकीय भीमगड रिसॉर्टपर्यंत खानापूर तालुक्याच्या हद्दीत येणारा रस्ता पूर्णतः उखडून सडून गेला आहे.
आता ऊस वाहतूक सुरू झाल्यानंतर उरलासुरला रस्ताही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या रस्त्याची त्वरित तात्पुरती डागडुजी करावी, अशी उद्विग्न मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
आमदारांचे आश्वासन कागदावरच राहणार का?
पुढील वर्षी २८ एप्रिल रोजी काटगाळी गावाची महालक्ष्मी देवी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यात्रेपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ठाम हमी दिली आहे. मात्र, अवघ्या चार महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? आणि या मुदतीत रस्ता पूर्ण होणार का? असा सवाल ग्रामस्थ करतआहेत.
Advertise
Advertise



