नेत्यांपुढे हात पसरण्यापेक्षा स्वतःची वर्गणी बरी!
नागुर्डा, वाडा अन् विश्रांतवाडीच्या युवकांचा स्वाभिमानी आदर्श
नागुर्डा: राजू कुंभार
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावोगावी नेत्यांकडून स्पर्धांच्या नावाखाली मोठी रक्कम उकळण्याच्या सरधोपट प्रथेला येथील युवकांनी दणदणीत फाटा दिला आहे. कसल्याही राजकीय दबावाला किंवा नेत्यांच्या दातृत्वाला न जुमानता नागुर्डा, वाडा आणि विश्रांतवाडी येथील तरुण एकत्र आले आणि त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे व वर्गणी काढून दिमाखदार क्रिकेट स्पर्धा भरवली. लोकप्रतिनिधींसमोर हात न पसरवता घेतलेला हा निर्णय सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
काय आहेत स्पर्धा आणि आयोजनाची वैशिष्ट्ये?
श्री नागेशदेव स्पोर्ट्स यांच्या वतीने दिवाळीच्या औचित्यानिमित्त ‘नागुर्डा ग्राम पंचायत लीग २०२६’ या क्रिकेट स्पर्धेचे सलग तिसऱ्या वर्षी दणक्यात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणीचे क्रीडा शिक्षक जयराज चापगावकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी गावातील क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकाग्रहातून, लोकांसाठीच बक्षिसे!
या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही आमदार, माजी आमदार किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुकांसमोर मदतीसाठी हात पसरण्यात आले नाहीत. गावकऱ्यांनी आणि तरुणांनी स्वतः पुढे येऊन बक्षिसे प्रायोजित केली आहेत:
- प्रथम क्रमांक: लाल शिंगी मेंढा:श्री जयराज अशोक चापगांवकर(युवा नेतृत्व) यांच्याकडून.
- प्रथम क्रमांक चषक: सौ. पूजा उदय महाजन (अध्यक्षा, दूध उत्पादक संघ, नागुर्डा) यांच्याकडून.
- द्वितीय क्रमांक (५००१ रुपये रोकड): गावातील तरुण ट्रॅक-ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक उद्योजक — श्री जोतिबा नारायण मोगरे, श्री नारायण नामदेव कोलेकर, श्री शंकर गंगाराम महाजन आणि श्री राजू लक्ष्मण कोळी यांच्या देणगीतून.
- द्वितीय क्रमांक ट्रॉफी: श्री मारुती परशराम पाखरे (Hescom कर्मचारी) यांच्यातर्फे.
- उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज बक्षिसे: विश्रांतवाडीचे होतकरू युवा मूर्तिकार श्री संदीप धाकल्लू कुंभार यांच्याकडून.
एक चपखल संदेश: समस्या सोडवा, नेत्यांसमोर झुकू नका!
आज अनेक गावोगावी रस्ते खराब आहेत, गटारी तुंबलेल्या आहेत, शाळांची दुरवस्था झाली आहे आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आ वासून उभा आहे. मात्र, गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही; उलट निवडणुका जवळ आल्यावर नेत्यांकडून मोठ्या रकम मागून स्पर्धा भरवण्याची नवी फॅशन रूढ झाली आहे.
अशा अंधानुकरणाला छेद देत, “आमची स्पर्धा आमच्या हिमतीवर” असा नारा देत नागुर्डा, वाडा आणि विश्रांतवाडीच्या युवकांनी स्वाभिमानाचा जो दीप तेववला आहे, तो खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांना चपराक देणारा आणि नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. या तरुणांच्या या स्वाभिमानी भूमिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Advertise

Advertise


