न्यू होरायझनच्या विद्यार्थ्यांनी घेतले माती कलेचे धडे!


चाकावर पणत्या अन् टेराकोटा वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण; २४४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

 औरनाळ प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे हात प्रत्यक्ष कलानिर्मितीपासून दूर जात असताना, त्यांच्यातील सर्जनशीलतेला चालना देत पारंपरिक माती कलेची ओळख करून देण्याच्या उद्देशाने न्यू होरायझन स्कूल, औरनाळ येथे कला विभागामार्फत माती काम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत चाकावर स्वतः पणत्या, लोटकी (सुगड) तसेच विविध मातीच्या वस्तू तयार करण्याचे धडे घेतले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला विभागप्रमुख श्री. स्वप्निल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून वस्तू तयार करण्याच्या पारंपरिक कलेची सविस्तर माहिती दिली. जमिनीतील मातीपासून एखादी वस्तू तयार होऊन ती ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत कराव्या लागणाऱ्या विविध प्रक्रियांची त्यांनी विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. तसेच पारंपरिक पद्धतीने हाताने व चाकावर वस्तू तयार करण्याची कला आणि आधुनिक काळात या कलेत झालेले बदल यातील फरकही स्पष्ट केला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फिरत्या चाकावर पणत्या कशा तयार कराव्यात, टेराकोटा पद्धतीने मातीच्या आकर्षक वस्तू व मूर्ती कशा घडवाव्यात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः चाकावर मातीला आकार देत विविध प्रकारच्या पणत्या आणि सुगड तयार केले. मातीला आपल्या कल्पकतेतून आकार देण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला.

विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईलवर वेळ न घालवता आपल्या हातांनी काहीतरी नावीन्यपूर्ण निर्माण करावे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि पारंपरिक माती कलेची ओळख व्हावी, हा या कार्यशाळेमागील मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे, दिवाळी सणासाठी बाजारातून पणत्या खरेदी करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पणत्यांचा वापर करावा, या संकल्पनेलाही या उपक्रमातून प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील, सहकला शिक्षिका सौ. आरती नाईक, ग्रंथपाल श्री. अमोल चोथे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!