बाळेकुंद्रीत पंत महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात भक्तीचा महासागर!


भक्तीपदे, पालखी सोहळा आणि नामस्मरणाने बाळेकुंद्री नगरी दुमदुमली; लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

बेळगाव प्रतिनिधी: 

श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथे सद्गुरू श्री पंत महाराज यांच्या १२१ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याची गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. श्री पंत महाराजांच्या चरणी लीन होऊन भाविकांनी दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

मंगळवार, दि. २७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या उत्सवात प्रेमध्वज मिरवणूक, पुण्यस्मरण कार्यक्रम, पालखी सोहळा आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव येथील समादेवी गल्लीतील श्री पंत महाराजांच्या वाड्यातून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. बुधवारी श्रींच्या पालखी सोहळ्याने भक्तांच्या उत्साहात भर घातली.

या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे भाविकांकडून गायली जाणारी भक्तिपदे, भजने आणि अखंड नामस्मरण. टाळ-मृदंगाच्या निनादात पंत महाराजांच्या भक्तिपदांचे गायन करताना भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते. भक्तांच्या मुखातून उमटणारा जयघोष, श्रींच्या दर्शनासाठी झालेली गर्दी आणि सर्वत्र जाणवणारा उत्साह यामुळे बाळेकुंद्री नगरी भक्तिमय झाली होती.

गुरुवारी दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले. श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महाप्रसादाच्या माध्यमातून सेवा, समर्पण, समता आणि बंधुभावाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. त्यानंतर प्रेमानंद टिपरी कार्यक्रम आणि पालखी सोहळ्याच्या समारोपाने उत्सवाची सांगता झाली.

श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संगम!

श्री पंत महाराजांच्या विचारांचा आणि भक्तिपरंपरेचा वारसा जपणारा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता महाराष्ट्र-कर्नाटकातील भाविकांना एकत्र आणणारा श्रद्धेचा उत्सव ठरला. भक्तिपदांचा गजर, श्रींच्या चरणी नतमस्तक होणारे भाविक आणि महाप्रसादाच्या माध्यमातून अनुभवायला मिळालेला सेवाभाव यांमुळे हा सोहळा भाविकांच्या मनात भक्तीमय आठवणी निर्माण करून गेला.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!