स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण होऊनही तळावडे गवळीवाडा विजेविना अंधारात


स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण होऊनही तळावडे गवळीवाडा विजेविना अंधारात

जांबोटी भागातील डझनभर नेते बिनकामाचेच? नागरिकांचा तीव्र संताप

खानापूर / राजू कुंभार

देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण होत आली तरी, खानापूर तालुक्यातील गोल्याळी ग्रामपंचायत हद्दीतील तळावडे गवळीवाडा अजूनही अंधारातच आहे. या दुर्गम वाडीला आजतागायत वीज पोहोचली नसल्याने येथील नागरिकांचे जगणे पूर्णपणे अंधारमय झाले आहे. एका बाजूला विकासाचे डंका पिटले जात असताना, दुसरीकडे स्वातंत्र्याची ८० वर्षे लोटल्यानंतरही येथील नागरिकांना मूलभूत अशा वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत आहे, ही राजकारण्यांच्या तोंडाला काळे फासणारी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

जांबोटी भागातील नेते म्हणजे केवळ ‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’?

जांबोटी परिसरात डझनभर पुढारी आणि नेते मिरवत असतात, पण प्रत्यक्षात हे सर्व नेते बिनकामाचे ठरले आहेत का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. केवळ इतर गावात जाऊन थापा मारणे, मोठमोठी भाषणे ठोकणे आणि स्वतःचा उद्धार करून घेणे यातच या तथाकथित नेत्यांचे आयुष्य जात आहे. मात्र, आपल्याच परिसरातील एक पाडा अंधारात चाचपडतोय, साध्या विजेसाठी वणवण करतोय, याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या या नेत्यांना सत्तेची आणि मतांची लाचारी करताना लाज वाटत नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

जंगलाच्या दाटीत दहशतीखाली जगणे

रात्रीच्या वेळी या अंधाऱ्या वाडीतील विद्यार्थ्यांची आणि चिमुरड्यांची अवस्था अत्यंत दयनीय होते. दाट जंगल आणि झुडपांमधून कधीही हिंस्त्र व जंगली जनावरे वस्तीत येण्याची दाट शक्यता असते. अशा जीवघेण्या संकटात महिला, वृद्ध आणि लहान मुलांना स्वतःचा जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. आजच्या आधुनिक युगातही साधी विज व उजेड नसीब नसल्याने या नागरिकांना जणू मानवी अधिकारांपासूनच वंचित ठेवले गेले आहे, तरीही इथले निर्लज्ज नेते केवळ स्वार्थी राजकारणाच्या गप्पा मारण्यात मग्न आहेत.

तहसीलदार व हेस्कॉम कार्यालयाला धडक; प्रशासकीय उंबरठ्यावर हाक

नेत्यांच्या या बेजबाबदारपणाला आणि अनास्थेला कंटाळून अखेर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर समस्येबाबत खानापूरचे तहसीलदार आणि संबंधित महावितरण (हेस्कॉम) विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर करून गावात त्वरित वीज संपर्क उपलब्ध करून देण्याची आक्रमक मागणी करण्यात आली आहे.

तळावडे, गौळीवाडा येथे सुमारे ६० हून अधिक लोक अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत वस्ती करून राहत आहेत. मात्र, स्वतंत्र भारताच्या इतिहासात या वाडीवर कधीही विजेचा प्रकाश पडला नाही. वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण अंद्यारात होत असून दैनंदिन जीवन आणि शेतीविषयक कामे कठीण झाली आहेत.

ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे: मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी अखेर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी खानापूरचे तहसीलदार कार्यालय तसेच साहाय्यक कार्यकारी अभियंता (हेस्कॉम, उप विभाग खानापूर) यांच्या कार्यालयात धडक देऊन निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात श्री. भागू धाकलु धनगर, संजय पाटील, विठ्ठल धनगर, बिरू धनगर, नवलू अवने, इजू अवने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

नेत्यांच्या थोबाडीत चपराक बसणार का?

फक्त मतांसाठी फिरणाऱ्या आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या थोबाडीत चपराक बसवणारी ही घटना आहे. आता यावर प्रशासन आणि  हेस्कॉम नेमकी काय ठोस कारवाई करणार, की पुन्हा कागदी घोडे नाचवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसणार, याकडे तळावडे-गवळीवाड्यातील आक्रमक ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. जर तातडीने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर येत्या काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!