भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड; जैवविविधतेचा धोका


टोरंट पॉवरच्या ३,००० मेगावॅट पंप्ड-स्टोरेज प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन; वन्यजीवांचा अधिवास, जलस्रोत आणि स्थानिक हवामान धोक्यात येण्याची चिंता.

ग्रामदूत प्रतिनिधी: रायगड 

सह्याद्रीच्या हिरव्यागार जंगलपट्ट्यातील हजारो झाडांवर कुऱ्हाड चालू लागल्याने कर्जत–भीमाशंकर परिसरातील पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सायडोंगर, कोतवाल खलाटी, पाली, धाक आदी परिसरात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या पंप्ड-स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ताज्या वृत्तांनुसार ३२ हजारांहून अधिक झाडे तोडली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र कंपनीच्या पर्यावरणीय कागदपत्रात २३३ हेक्टर वनक्षेत्रासाठी सुमारे ४८ हजार झाडे व झुडपांवर परिणाम होण्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे.

 

सह्याद्रीचा हा जंगलपट्टा स्थानिक हवामानाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. चालू वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे अख्या महाराष्ट्राला त्याची झळ लागली असून त्यातच भीमाशंकर येथील मोठ्या प्रमाणावर जंगल कमी झाल्यास भविष्यात तापमानवाढ, पर्जन्यमानातील बदल आणि पाण्याची उपलब्धता यावर परिणाम होऊ शकतो, अशी पर्यावरणतज्ज्ञांची चिंता आहे.

नेमका प्रकल्प कोणाचा?

या वादाच्या केंद्रस्थानी टोरंट पॉवरशी संबंधित Torrent PSP 3 Private Limitedचा ‘Saidongar-1 Karjat Open Loop Pumped Storage Project’ आहे. अधिकृत वनमंजुरीच्या नोंदीत ३,००० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी कर्जत तालुक्यातील पाली, कोतवाल खलाटी, सायडोंगर आणि धाक परिसरातील २३३ हेक्टर वनजमीन वळविण्याचा प्रस्ताव नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय वन मंत्रालयाच्या नोंदीतही हा प्रस्ताव Torrent PSP 3 Private Limitedच्या नावावर आहे.

कपडे काढून टोपी घालणे बंद करा: पर्यावरणप्रेमी 

कंपनीच्या मेघना बोर्डीकर यांनी वृक्षतोडीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, भीमाशंकर परिसरात प्रकल्पासाठी जितक्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे, त्याच्या दुप्पट प्रमाणात नवीन वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ३३ टक्के ग्रीन कव्हर राखण्याची किंवा विकसित करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

त्यांच्या या स्पष्टीकरणावर स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी आपली भूमिका मांडत म्हणाले कि,

“कपडे काढून टोपी घालणे बंद करा. झाडं लावण्याचा हिशोब सांगता, पण तोडलेल्या जंगलाची सावली आणि पक्ष्यांची घरटी कोण परत देणार?”

आज एका झाडासाठी उठणारा आवाज कदाचित छोटा वाटेल; पण उद्या संपूर्ण जंगल वाचवण्यासाठी तोच आवाज निर्णायक ठरू शकतो. कारण जंगल वाचले तरच जैवविविधता वाचेल, पाणी वाचेल आणि आपला भविष्यातील श्वासही वाचेल.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!