नागुर्डा-वाडा खून प्रकरण: संशयाची सुई फरार मेस्त्रीकडे 


नागुर्डा-वाडा खून प्रकरण: संशयाची सुई फरार मेस्त्रीकडे 

संशयित कल्लाप्पा मळवकरवर गुन्हा 

खानापूर: राजू कुंभार

बालिंगा (ता. करवीर) येथील हनुमान गल्लीत अत्यंत भयानक आणि थरारक घटना काल उघडकीस आली होती. नागुर्डा येथील ६५ वर्षीय वृद्ध गवंडी कामगार महादेव रामू गवसेकर यांची राहत्या घरात धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली होते . ते मेस्त्री कल्लाप्पा मळवकर (रा. मोदेकोप) याच्याकडे कामाला होते तो घटना घडल्यापासून फरार झाला असून, करवीर पोलिसांनी त्याच्या शोधासाठी जाळे विणले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

बालिंगा येथील ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या वसंत कृष्णा ढेंगे यांच्या भाड्याच्या खोलीत महादेव गवसेकर, मेस्त्री कल्लाप्पा मळवकर आणि इतर दोन कामगार राहत होते. हे सर्वजण परिसरात फरशी फिटिंग व बांधकामाचे काम करत असत. नागदेववाडी येथील उत्तम निगडे यांच्या घरातील काम पूर्ण केल्यानंतर २८ तारखेला कल्लाप्पा मळवकर याने मजुरीचे पैसे उचलले. त्यानंतर कल्लाप्पाचा फोन बंद (नॉट रीचेबल) झाला आणि महादेव गवसेकरही अचानक गायब झाले.

शनिवारी या खोलीतून अचानक असह्य दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. गल्लीतील नागरिकांनी तातडीने पोलीस पाटील अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून करवीर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

झोपेतच केला प्राणघातक हल्ला!

पोलिसांनी उघड्या खोलीत प्रवेश केला असता समोरचे दृश्य थरकाप उडवणारे होते. महादेव गवसेकर यांचा मृतदेह अंथरुणात रक्ताच्या थारोळ्यात पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत पडलेला होता. प्राथमिक पाहणीनुसार:

मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर, छातीवर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने खोलवर वार करण्यात आले होते.

अंथरुणातच मृतदेह आढळल्याने, गवसेकर गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही हत्या शनिवारीच घडली असावी आणि मृतदेह कित्येक दिवस पडून राहिल्याने तो कुजल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी पोलिसांची धाड, ठसेतज्ज्ञ पाचारण

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक शंकर कळकुटे, आणि महिला पोलीस नाईक परवीन मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ (Fingerprint Experts) आणि फॉरेन्सिक पथकाला तातडीने पाचारण करून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रीतम केसरकर आणि रविराज बलुगडे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला.

मृत महादेव गवसेकर यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी फरार मेस्त्री कल्लाप्पा मळवकर याच्याविरुद्ध प्रमुख संशयित म्हणून गुन्हा नोंदवला आहे. पैशांच्या वादातून हा खून झाला की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, हत्येच्या घटनेमुळे संतप्त झालेले नागुर्डा येथील गावपंच मारुती पाखरे, नारायण देसुरकर, लक्ष्मण पारवडकर, नागेश पारवडकर, सुनील सोले व अन्य ग्रामस्थांनी कालपासून पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. करवीर पोलीस फरार कल्लाप्पाचा तीव्रतेने शोध घेत आहेत.

Advertise………


110
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!