खिद्रापूरच्या मातीत सापडला प्राचीन शिल्पवैभवाचा ठेवा.


नंदी, बालकाला कडेवर घेतलेल्या स्त्रीचे कोरीव शिल्प आणि बुद्धसदृश मुखाकृती आढळली; आणखी अवशेष मिळण्याची शक्यता.

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार.

खिद्रापूर येथील ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर परिसरातील विकासकामांसाठी सुरू असलेल्या माती उत्खननादरम्यान प्राचीन शिल्पांचा दुर्मीळ ठेवा आढळून आला आहे. यामध्ये नंदीची मूर्ती, बालकाला कडेवर घेतलेल्या स्त्रीचे सुबक कोरीव शिल्प तसेच बुद्धसदृश मुखाकृती असलेल्या शिल्पाचा समावेश आहे. या शिल्पांवरील बारकाईने केलेली कलाकुसर लक्ष वेधून घेत आहे.

उत्खननस्थळी नागरिकांची गर्दी:

माती काढताना बाहेर आलेले हे ऐतिहासिक अवशेष सध्या मंदिर परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहेत. शिल्पे पाहण्यासाठी नागरिक व इतिहासप्रेमींची गर्दी होत आहे. या भागात आणखी प्राचीन अवशेष दडलेले असण्याची शक्यता व्यक्त होत असून, उत्खननाचे काम अधिक काळजीपूर्वक करण्याची मागणी होत आहे.

पुरातत्त्वीय तपासणीची गरज:

सापडलेल्या शिल्पांचे तातडीने अधिकृत छायाचित्रण, मोजमाप व पुरातत्त्वीय परीक्षण करून त्यांची नोंद शासकीय दप्तरी घेणे आवश्यक असल्याचे इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे. तसेच पुढील उत्खनन पुरातत्त्व तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही शिल्पे नेमक्या कोणत्या कालखंडातील आणि कोणत्या सांस्कृतिक परंपरेशी संबंधित आहेत, हे तज्ज्ञांच्या अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.

विकासकामांदरम्यान सापडला शिल्पठेवा:

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अधिपत्याखाली कोपेश्वर मंदिर परिसरातील विविध विकासकामांना सुरुवात झाली आहे. संरक्षक भिंत बांधणे, पाथवे तयार करणे, परिसराचे सुशोभीकरण आणि मंदिराच्या संरचनात्मक सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट आदी कामे सुरू आहेत. याच कामासाठी माती काढताना ही प्राचीन शिल्पे आढळून आली.

दरम्यान, उत्खननस्थळी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी किंवा जबाबदार अभियंते प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्राचीन अवशेषांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शिल्पांचे संवर्धन व सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!