महांतेश पाटील यांच्या आरोपांचे SDMC कडून खंडन


महांतेश पाटील यांच्या आरोपांचे SDMC कडून खंडन

पत्रकार परिषदेत खुलासा

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील बरगाव येथील सरकारी हायर प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष महांतेश पाटील यांनी आमदार व खासदारांकडून शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे शाळा व्यवस्थापन समितीने पत्रकार परिषद घेऊन खंडन केले.यावेळी भाजप खानापूर महिला मोर्चाचा अध्यक्षा सुनिता संतोष पाटील,SDM अध्यक्ष मारुती लोकोळकर, विनायक देसाई, महेश पाटील, यल्लप्पा अर्दाळकर, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

नुकताच बरगाव येथे खासदार व आमदारांचा ‘सेवा संकल्प अभियान’ दौरा झाला. यावेळी बरगाव येथील सरकारी शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे मांडण्यात आला. शाळेची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक असल्याचे समितीने यावेळी निदर्शनास आणून दिले.

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शाळेच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत आश्वासन दिल्याचे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शाळेची तातडीची गरज लक्षात घेऊन यापूर्वीच आमदारांनी दोन ते तीन लाख रुपयांचा खर्च करून प्राथमिक स्वरूपातील काम सुरू करण्याच्या सूचना शाळा समिती व गावातील काही ज्येष्ठ नागरिकांना दिल्या होत्या, तसेच तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात पंचनामा करून आराखडा तयार करण्याची सूचना केली होती असा दावाही समितीने केला.

त्यामुळे आमदारांचे शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करणे योग्य नाही, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आमदार हलगेकर हे गावाच्या विकासासाठी तसेच शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेऊन शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि खानापूर तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनीही आमदारांची भेट घेऊन शाळेच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, खासदारांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यावेळी महांतेश पाटील यांनी शाळेच्या दुरुस्तीचा विषय प्रत्यक्ष उपस्थित केला नसल्याचा दावा शाळा व्यवस्थापन समितीने केला. प्रत्यक्ष दौऱ्यावेळी विषय न मांडता नंतर पत्रकार परिषद घेऊन आमदार, खासदार तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप करणे योग्य नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

शाळेच्या दुरुस्तीचा प्रश्न राजकीय वादाचा विषय न बनवता, सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेची इमारत लवकरात लवकर सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शाळा व्यवस्थापन समितीने केले.

Advertise


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!