
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉलमध्ये रवळनाथ हायस्कूल उपविजेता
पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खानापूर: राजू कुंभार
सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्यातील सरकारी के. बी. एस. माध्यमिक शाळा, मुगळीहाळ येथील मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाणच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विजयी वाटचाल व उत्कृष्ट खेळ
स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात शिवठाणच्या खेळाडूंनी सांघिक खेळ, उत्कृष्ट बचाव, आक्रमक चढाया आणि संयमी खेळाचे दर्शन घडविले. पहिल्या फेरीत बेळगाव तालुका-शहर संघावर मात करीत शिवठाणच्या संघाने विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत रामदुर्ग तालुका संघावर विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत बैलहोंगल तालुका संघाविरुद्ध कडवी झुंज देत संघाने आपली विजयी वाटचाल कायम ठेवली. अंतिम टप्प्यातही शिवठाणच्या खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार लढत देत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे शिवठाण हायस्कूलचे तसेच संस्थेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.
कर्णधार लक्ष्मण कोलकारचे प्रभावी नेतृत्व
या सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार लक्ष्मण कोलकार याने अत्यंत उत्कृष्ट आणि प्रभावी खेळाचे प्रदर्शन केले. निर्णायक प्रसंगी केलेल्या आक्रमक खेळामुळे तसेच संघातील सहकाऱ्यांना योग्य दिशा देत केलेल्या नेतृत्वामुळे त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या खेळाचे क्रीडाप्रेमी तसेच विरोधी संघातील खेळाडूंनीही कौतुक केले.
पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिवठाणच्या संघातील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कर्णधार लक्ष्मण कोलकार याच्यासह आणखी चार खेळाडूंचा समावेश आहे. राज्यस्तरीय स्पर्धा आगामी १४ तारखेच्या सुमारास होण्याची शक्यता असून, त्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जात आहे.
या संघाला प्रशिक्षक म्हणून श्री पी. टी. चोपडे, तर संघ व्यवस्थापक म्हणून श्री एन. व्ही. नाईक व श्री व्ही. बी. पाटील यांनी मार्गदर्शन व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. संघाला शाळेचे मुख्याध्यापक श्री पी. ए. पाटील तसेच शिक्षकवर्गाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री वाय. एन. मजुकर सर व सेक्रेटरी श्री प्रसाद मजुकर यांनी खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाचे अभिनंदन केले.
Advertise




