हत्या करून मृतदेह मलप्रभा नदीत फेकला, गुन्हा दाखल
खानापूर:
वर्षभरापूर्वी चाकू हल्ला केल्याचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीनं तरुणाचा खून करून, पुरावा लपविण्याचा उद्देशाने शंकरपेठ जवळील मलप्रभा नदीत मृतदेह टाकण्यात आला होता. ऐन गणपती उत्सवात या घटनेने मोदेकोप, नागुर्डा, ओतोळी, दारोळी परिसरात खळबळ माजली होती.
मारुतीनगर (बेळगाव)येथील सर्वेश कंग्राळकर (वय २७) या तरुणाच्या खूनप्रकरणी कपिलेश्वर कॉलनीतील शशी झालगार याच्यासह त्याच्या साथीदारांवर माळमारुती पोलिस ठाण्यात शुक्रवारी उशिरा (ता. २५) गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, २० सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसात ते २५ सप्टेंबरच्या दुपारी बाराच्या दरम्यान सर्वेशच्या पोटावर व मानेवर धारदार किंवा अन्य हत्याराने वार करण्यात आले. हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीत फेकून देण्यात आला.
सर्वेश २० सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान मंडोळी रोड परिसरात त्याच्यावर हल्ला झाल्याचे धागेदोरे मिळाल्यानंतर, पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह शोधून काढला. सुमारे वर्षभरापूर्वी सर्वेशने शशी झालगार याच्यावर चाकूने हल्ला केला होता, त्याचा राग मनात धरून शशीने साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संशयित दोघांचा पोलिस शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.



