वडगांव नॉट रिचेबल! शिक्षकांची तारांबळ
खानापूर : राजू कुंभार
डिजिटल भारताच्या स्वप्नात ग्रामीण भागातील शिक्षण मात्र अजूनही नेटवर्कच्या शोधात अडखळत आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन हजेरी सक्तीची केली खरी, पण शाळा परिसरात मोबाईलला सिग्नलच नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दररोज चक्क १ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ‘शिकायचे सोडून रेंज शोधायची’ असा नवाच पायंडा वडगाव शासकीय प्राथमिक शाळेत पडल्याने हा प्रकार सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय ठरत आहे.
नुकताच गावातील नागरिकांनी एसडीएमसी अध्यक्ष सागर दळवी आणि माजी ग्रा.प सदस्य सुनिल देसाई यांच्या नेतृत्वात आमदार विठ्ठल हलगेकर यांना BSNL टॉवर उभारण्याची मागणी केली.
नक्की काय घडतेय?
शासनाच्या नवीन नियमानुसार शिक्षकांना ‘कर्तव्य’ अॅपवर आणि विद्यार्थ्यांची हजेरी ‘निरंतर’ अॅपवर ऑनलाईन नोंदवणे बंधनकारक आहे. परंतु, जांबोटी परिसरातील वडगाव गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे समाधानकारक नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे ऑनलाईन हजेरी लावणे, शैक्षणिक अहवाल सादर करणे किंवा डिजिटल उपक्रम राबवणे या सगळ्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चक्क पावसा-पाण्यात १ किलोमीटर दूर जावे लागत आहे.
अभ्यासाचा वेळ ‘रेंज’ शोधण्यात वाया!
दररोजच्या या कसरतीमुळे शालेय वेळेचा मोठा अपव्यय होत असून, त्याचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर आणि शिक्षणावर होत आहे. नेटवर्क अभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम आणि माहिती मिळवण्याचे मार्ग पूर्णपणे बंद पडले आहेत.
टॉवर उभा राहणार की हजेरी रखडणार?
शासनाने डिजिटल प्रणाली लागू करताना ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीचा विचार केला नसल्याचे यावरून दिसून येते. BSNL व दूरसंचार विभागाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावा आणि ही अडचण कायमस्वरूपी दूर करावी.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना मूलभूत नेटवर्कच नसणे ही शोकांतिका आहे. वडगाव-जांबोटी परिसरात BSNL चा मोबाईल टॉवर उभारल्यास ही कसरत थांबेल.”— सागर दळवी, अध्यक्ष, SDM



