₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर आता MDR; ग्राहकांवर थेट शुल्क नाही.


15 ऑक्टोबरपासून पात्र व्यापारी व्यवहारांवर 0.40 टक्के शुल्क; ₹75,000 किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहारांसाठी कमाल MDR ₹300.

विशेष प्रतिनिधी : नवी दिल्ली.

देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या UPI व्यवहारांच्या शुल्करचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर 0.40 टक्के Merchant Discount Rate (MDR) लागू होणार आहे. हा शुल्कभार व्यापारी व्यवहाराच्या व्यवस्थेवर राहणार असून, ग्राहकाच्या खात्यातून स्वतंत्र UPI शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. 

या बदलामुळे एखाद्या दुकानात, व्यवसायाकडे किंवा पात्र व्यापाऱ्याकडे ₹2,000 पेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास MDR लागू होईल. मात्र ₹2,000 पर्यंतचे पात्र व्यापारी UPI व्यवहार शुल्कमुक्त राहतील. तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे P2P व्यवहार कोणत्याही रकमेचे असले तरी MDRमधून मुक्त राहतील. त्यामुळे मित्र, नातेवाईक किंवा इतर व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवताना या नव्या शुल्काचा थेट परिणाम होणार नाही. 

MDR किती असेल?

नव्या व्यवस्थेनुसार ₹2,000 पेक्षा जास्त पात्र व्यापारी व्यवहारांवर 0.40 टक्के MDR आकारला जाईल. मात्र मोठ्या व्यवहारांसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ₹75,000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारावर MDR कमाल ₹300 प्रति व्यवहार असेल. त्यामुळे ₹1 लाख किंवा ₹5 लाखांचा पात्र व्यवहार झाला तरी MDR ₹300 पेक्षा अधिक जाणार नाही.

उदाहरणातून समजून घ्या:

समजा एखाद्या ग्राहकाने दुकानातून ₹10,000ची खरेदी केली आणि UPIद्वारे पेमेंट केले. 0.40 टक्के MDRनुसार ₹40 शुल्क ठरते. मात्र ग्राहकाच्या खात्यातून ₹10,040 कापले जाणार नाहीत; ग्राहकाने भरायची खरेदीची रक्कम ₹10,000च राहते. MDR हा व्यापारी पेमेंटच्या व्यवस्थेतील शुल्क आहे.

त्याचप्रमाणे ₹20,000च्या व्यवहारावर MDR ₹80, तर ₹50,000च्या व्यवहारावर ₹200 होईल. ₹75,000च्या व्यवहारावर 0.40 टक्के म्हणजे ₹300 होतात आणि त्यानंतर व्यवहाराची रक्कम वाढली तरी कमाल MDR ₹300च राहणार आहे. 

छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा

नव्या व्यवस्थेत UPI QR कोडद्वारे दरमहा ₹1 लाखांपर्यंत प्राप्ती करणाऱ्या पात्र छोट्या व्यापाऱ्यांना MDRमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या दुकानदाराला हा शुल्कभार आपोआप लागू होणार नाही.

व्यापाऱ्यांकडून MDR चा भार ग्राहकांवर लादला जाणार?

व्यापाऱ्यांना होणाऱ्या या अतिरिक्त शुल्क भार व्यापारी ग्राहकांवर लादणार का? या मुळे सरकार-व्यापारी-ग्राहक अशी त्रिसूत्री योग्यपने पार पडून भारताचा डिजिटल इंडिया चे स्वप्न सफल होईल का याकडे जनतेचे लक्ष्य राहणार आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!