खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा


खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी; तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खानापूर: राजू कुंभार

खानापूर तालुका व बेळगाव परिसरामध्ये पावसाने मारलेल्या ओढीमुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील पिके पार करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा, तसेच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी आणि कृत्रिम पावसासाठी (क्लाउड सीडिंग) ठोस पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी काँग्रेस नेते प्रसाद पाटील सह स्थानिक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व तालुका दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.

तालुक्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली असून, शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिके हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे पाळीव जनावरांसाठी चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

* नुकसानभरपाई व पंचनामे: पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीचा तातडीने आढावा घेण्यासाठी विशेष पाहणी पथक (Survey Team) पाठवून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया त्वरित सुरू करावी.

* चारा व छावण्यांची सोय: जनावरांसाठी तात्काळ चारा पुरवठा करण्यात यावा आणि ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची (पाणी कुंड्यांची) सोय करावी.

कर्जमाफी व कृत्रिम पाऊस: स्थानिक शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी संपूर्ण शेती कर्जमाफी द्यावी आणि टंचाईग्रस्त भागात कृत्रिम पावसासाठी राज्य सरकारने तातडीने हालचाली कराव्यात.

या निवेदनाच्या प्रती बेळगावचे उपायुक्त (DC), महसूल मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि मुख्यमंत्री यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.निवेदन सादर करताना शेतकरी प्रसाद पाटील, कल्लाप्पा लोहार, नितीन कुंभार आणि प्रशांत पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन त्वरित दिलासादायक उपाययोजना राबवाव्यात, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


107
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!