दोन माजी आमदारांच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैना 


दोन माजी आमदारांच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दैना 

खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

दोन माजी आमदारांच्या गावांना जोडणाऱ्या संपर्क रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या भागातील वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकप्रतिनिधी बदलले, आमदार माजी झाले, पण जनतेचे नशीब काही बदलेना!” इदलहोंड आणि गर्लगुंजी या दोन माजी आमदारांच्या गावांना जोडणाऱ्या अवघ्या तीन किलोमीटरच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून हाच प्रश्न उपस्थित होत आहे. माजी आमदार दिगंबर पाटील यांचे इदलहोंड आणि माजी आमदार कै.वसंतराव पाटील यांचे गर्लगुंजी, या दोन वजनदार नेत्यांच्या गावांना जोडणारा हा संपर्क मार्ग आज प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे चक्क ‘मृत्यूचा सांगडा’ बनला आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात विट उत्पादन (वीट भट्ट्या) व्यवसाय चालतो. दररोज येथून वीट वाहतूक करणारे अवजड ट्रक आणि ट्रॅक्टर यांची मोठी ये-जा सुरू असते. मुळातच देखभाल दुरुस्तीअभावी खराब झालेल्या या रस्त्यावर अवजड वाहनांची सततची वाहतूक होत असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याला गटाराचे आणि खड्ड्यांना तलावांचे स्वरूप आले आहे. गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आला असताना, नागरिक आणि भक्तांना या जीवघेण्या रस्त्यावरून खड्डे तुडवत प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना रोज तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांचे सत्र सुरुच आहे. पण निष्पाप बळी जाण्याची वाट हे झोपलेले प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

वीट भट्टी व्यावसायिक, स्थानिक शेतकरी आणि प्रवाशांना दररोज या खड्डेमय रस्त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.

प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा — गोपाळ पाटील यांचा घणाघात

“दोन माजी आमदारांची गावे जोडणारा हा रस्ता म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या जीवाची कसलीही पर्वा उरलेली नाही. सण-उत्सवाच्या काळात तरी या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी होणार की नागरिक रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणार?” असा घणाघाती इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी दिला आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!