सणासुदीवेळीच लाईटबील कलेक्टरांच्या घरात “आर्थिक अंधार”
3 महिन्यापासून पगार थकीत; मारुती पाखरे यांची माहीती
खानापूर: राजू कुंभार
खानापूर हेस्कॉम कार्यालयात गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत लाईटबील कलेक्टर(ग्राम विद्युत प्रतिनिधीं) चे गणेश चतुर्थीच्या तोंडावरच तीन महिन्याचे वेतन थकीत करण्यात आल्याने,कर्मचाऱ्यांच्या घरातच अर्थिक अंधार पसरला आहे, अशी प्रतिक्रिया ग्राम विद्युत प्रतिनिधी युनियन चे सेक्रेटरी मारुती पाखरे यानी दीली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून गृहज्योतीचे काम आणि नियमित कामे वेळेवर व व्यवस्थित पूर्ण करूनही मानधन मिळाले नसल्याने, कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करूनही ऐन सणाच्या काळात वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याने डोळ्यात अश्रू आणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही.
सरकारची ‘गृहज्योती’ योजना अमलात आल्यापासून या योजनेचे काम अत्यंत व्यवस्थितरीत्या हाताळून लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या ग्राम विद्युत प्रतिनिधींचे ऐन गणेशोत्सवात वेतन थकीत राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या २४ वर्षांपासून नियमित बिल वितरण करणे आणि ठरलेल्या वेळेत बिल भरणा करून घेणे, हे काम ते प्रामाणिकपणे करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ:
कायमस्वरूपी असलेल्या कामगारांचे वेतन दर महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होते आणि त्यांना सणासाठी बोनसही दिला जातो. मात्र, ग्राम विद्युत प्रतिनिधींनी वेतनाबाबत विचारणा केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून “फंड शिल्लक नाही” असे उत्तर दिले जाते.
विशेष म्हणजे, वेतनाची बिले दर महिन्याच्या ३ तारखेलाच जमा केली जातात. तरीसुद्धा अधिकारी “ग्राम विद्युत प्रतिनिधी वेळेत आपली बिले देत नाहीत” असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे या अन्यायकारक कारभाराविरोधात कामगारांमधून तीव्र खेद व्यक्त केला जात आहे.





