“चंदगड ” अमली पदार्थांच्या विळख्यात
चंदगड: स्वप्नील कुंभार
नुकताच राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), पुणे यांच्या पथकाने चंदगड तालुक्यात एक मोठी व धडक कारवाई हजगोळी येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये चालेलाल एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई केली. ही घटना ताजी असताच राजगोळी (खुर्द) येथील ओलम साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यावरील पत्र्याच्या शेडच्या अडोशाला बेकायदेशीर गांजा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमावर्ती असलेल्या चंदगड च्या अमली पदार्थाचे जाळे पुणे व्हाया मुंबई ठाणे पर्यंत असून तालुका अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेला असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
२५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास राजगोळी येथील कारखान्याच्या पत्र्याच्या शेड मध्ये उघड्यावर गांजा विक्री करत असताना पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे ९,००० रुपये किमतीचा आणि १७२ ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा (अंमली पदार्थ) हस्तगत करण्यात आला. प्रकरणी ताहीर ताजुद्दीन मंगसुळी(वय २७, रा. राजगोळी खुर्द, ता. चंदगड),विनोद गंगाप्पा कुंभार (वय ३०, रा. कुंभारगल्ली, राजगोळी खुर्द, ता. चंदगड)विजय शिवाजी नडगिरी (वय ३२, धंदा- मंडप डेकोरेशन, रा. भिमनगर, रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ, गडहिंग्लज) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताहीर मंगसुळी आणि विनोद कुंभार यांनी संगनमताने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी हा गांजा जवळ बाळगला होता. सदर गांजा त्यांनी विजय नडगिरी (रा. गडहिंग्लज) याच्याकडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS Act Section 8(c), 20(b)ii(B) सह BNS 3(5)) गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार कांबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक गेंगजे करत आहेत.


