४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड.
चंदगड प्रतिनिधी:श्री स्वप्निल कुंभार.
तमिळनाडू पासिंगची चारचाकी गाडी नावावर करून देण्याचे आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा कोदाळीतील ग्रीन हिल रिसॉर्ट चालक आकाश भालचंद्र देसाई याच्यावर झाला आहे.
या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात आरिष अजिज शेख (वय २०) रा. शिनोळी, ता. चंदगड, मूळ रा. पेनुर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.ते शिनोळी येथे काजू फॅक्टरीमध्ये काम करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी २०२६ पासून ते आजतागायतच्या काळात ही फसवणूक झाली. आरोपी आकाश देसाई याने आरिष शेख यांचा विश्वास संपादन केला. त्याने तमिळनाडू पासिंगची दुसऱ्याच्या नावावर असलेली पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार (क्रमांक TN 01 BW 5251) आठ दिवसांत आरिष यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले.
यासाठी आरोपीने आरिष यांच्याकडून ४ लाख रुपयांना गाडीची विक्री ठरवून १ लाख ५० हजार रुपये ऑनलाईनद्वारे आणि २ लाख ५० हजार रुपये रोख स्वरूपात, असे एकूण ४ लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही आजतागायत गाडी नावावर करून न देता विश्वासघात करून फसवणूक केली.
याप्रकरणी चंदगड पोलिसांनी आरोपी आकाश देसाई याच्यावर बीएनएस (BNS) ३१६(२) आणि ३१८(४) नुसार गुन्हा (गु.र.नं. २८६/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोएसआय) जालिंधर जाधव (स्था.गु.शा. कोल्हापूर) करत आहेत.



