स्व.मुलाच्या स्मृती जपण्यासाठी आईने उभारला वाचनालय हॉल.

येणेचवंडी येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण व हॉलचे लोकार्पण.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. ( चंदगड,आजरा, गडहिंग्लज)
गडहिंग्लज –दि. १५( संपत सावंत)
आपल्या पोटाच्या मुलाच्या अचानक जाण्याने झालेली दुःखाची जखम मनात बाळगण्यापेक्षा त्याच्या आठवणीतील समाजोपयोगी कार्यातून उजाळा देण्याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व प्रेरणादायी वस्तूपाठ येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील कळेकर कुटुंबाने घालून दिला. मौजे येणेचवंडी येथील श्रीमती शकुंतला शिवाजीराव कळेकर यांनी आपला सुपुत्र कै. संतोष कळेकर याची आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी गावातील वाचनालयाकरिता स्वखर्चाने प्रशस्त हॉल बांधून दिला. या नूतन हॉलचे लोकार्पण आणि स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण श्रीमती शकुंतला कळेकर यांच्या हस्ते झाले.

स्वागत व प्रास्ताविक संजय बिरंजे यांनी केले. माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक म्हणाले, ‘कै.संतोष कळेकर हे वाचनालयाचे नियमित वाचक होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती.त्यांच्या स्मृती जपण्यासाठी एक आईने दाखवलेल्या दातृत्वाला सलाम असल्याचे सांगितले. श्रीमती शकुंतला कळेकर, ध्वनीसामग्री भेट देणारे संभाजीराव लोंढे व हॉलचे उत्कृष्ट बांधकाम केल्याबद्दल कारागिर श्रीधर लोहार यांचा सरपंच दिपाली कांबळे, सदाशिव कुराडे व बाळेश नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी आनंदा कुऱ्हाडे, ए. एम. कुराडे, रामकृष्ण देसाई, ग्रंथपाल विजय इंगळे, लिपिक श्रीकांत मांगले, शिपाई परशुराम भोसले, सौ.संगीता इंगळे,सौ. शीला इंगळे, चंद्रदीप देसाई, सुरेश नलवडे, अरविंद लोंढे,संजय शिंदे, दत्तात्रय लोंढे, माजी सैनिक व त्यांचा परिवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे यांनी तर आभार दशरथ राऊत यांनी मानले. आईने मुलाच्या नावाने दिलेली ही अनोखी ज्ञानभेट संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे.


