वनरक्षक आश्लेषा मांगले यांची आत्महत्या.


माडखोल-धवडकी येथे निवासस्थानी आढळला मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार.

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली वनपरिक्षेत्रातील केसरी  वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या २२ वर्षीय आश्लेषा सागर मांगले (मूळ रा. लाकूरवाडी, आजरा) यांचा माडखोल-धवडकी येथील निवासस्थानी गळफास घेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीज च्या सुमारास घडली. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांच्या निधनाने आजरा, सावंतवाडी तसेच लाकूरवाडी गावावरती शोककळा पसरली आहे.

आश्लेषा मांगले या मागील तीन वर्षांपासून सिंधुदुर्ग वनखात्यात सेवेत होत्या. सध्या त्या आंबोली वनपरिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी सांभाळत होत्या. माडखोल-धवडकी येथे त्या पूजा गोवेकर यांच्या घरात भाड्याने राहत होत्या.

रविवारची सुट्टी असल्याने आश्लेषा मांगले दिवसभर घरातच असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उशिरापर्यंत त्या घराबाहेर न आल्याने घरमाल पूजा गोवेकर यांना संशय आला. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता आश्लेषा मांगले या मृतावस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलिस कर्मचारी महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वनविभागातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

याप्रकरणी कुटुंबीयांना माहिती देण्यात आली असून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!