दोन जणांचा मृत्यू; आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजनांचे आवाहन
आजरा | प्रतिनिधी : श्री. स्वप्निल कुंभार.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आजरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यात १५ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद असून, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी परिसरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आणि बिळांमध्ये पाणी भरल्यामुळे साप सुरक्षित आश्रयाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात. शेतातील गवत, झुडपे, लाकडांचे ढिगारे तसेच घराच्या आसपासच्या ओलसर जागांमध्ये त्यांचा वावर वाढत असल्याने सर्पदंशाचा धोका अधिक निर्माण होत आहे.
विशेषतः शेतात काम करणारे शेतकरी, जनावरांसाठी चारा आणणारे नागरिक तसेच रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. अनवाणी चालणे टाळावे, हातमोजे व गमबूटचा वापर करावा आणि टॉर्चच्या सहाय्यानेच अंधारात वावर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्पदंश झाल्यास कोणत्याही प्रकारचे घरगुती उपचार, झाडफूक किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपाय करू नयेत. जखमेवर चिरा देणे, विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा घट्ट बांधणे टाळावे. रुग्णाला शांत ठेवून तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे.

तालुक्यातील भादवण व कानोली परिसरातील दोन व्यक्तींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनेत विलंब न करता तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.






