10 लाख जनावरे! डॉक्टर 24, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता चव्हाट्यावर


10 लाख जनावरे ! डॉक्टर 24, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता चव्हाट्यावर

35 पदे रिक्त; गोमातेचे रक्षण केवळ निवडणुकापुरतेच!

खानापूर: राजू कुंभार

तालुक्यात तब्बल 10 लाख 8 हजार 545 एवढे मोठे पाळीव पशुधन असताना, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय विभागात मात्र भीषण कर्मचारी टंचाई निर्माण झाली आहे. 59 मंजूर पदांपैकी तब्बल 35 पदे रिक्त असून अवघ्या 24 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी पडल्याने लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे.

गोमातेच्या रक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधारी भाजप आणि लोकप्रतिनिधींचे प्रेम केवळ निवडणुकापुरतेच मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल पशुपालकांमधून विचारला जात आहे. गो सेवकांच्या बैठकीत गाईच्या आरोग्य विषयाची चर्चा होईल की केवळ गाईवरून धार्मिक चर्चा होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सद्या तालुका पशु वैद्याधिकारी म्हणून डॉ.मनोहर दादमी हे कार्यरत आहेत.तालुक्यात पशुपालनाची आकडेवारी पाहिली तर 3 लाख 400 गायी, 3 लाख 7 हजार 711 म्हशी, 9 हजार 957 शेळ्या-मेंढ्या/बकरी, 320 डुकरांसह 4 हजार 938 कुत्र्यांची पाळीव प्राणी म्हणून नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पशुधन असतानाही वैद्यकीय सुविधांच्या नावाने मात्र शून्यता पाहायला मिळत आहे.

कर्मचाऱ्यांची भीषण टंचाई

पशुवैद्यकीय विभागाच्या 30 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार तालुक्यातील कर्मचाऱ्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:

पशुवैद्यकीय अधिकारी: ११ मंजूर पदांपैकी ५ पदे रिक्त असून केवळ ६ अधिकारी कार्यरत आहेत.

पशुधन अधिकारी: २ पदे मंजूर असून दोन्ही पदे पूर्णपणे रिक्त आहेत.

वरिष्ठ व इतर निरीक्षक: १८ मंजूर पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.

गट-ड कर्मचारी (वर्ग-४): २२ मंजूर पदांपैकी तब्बल १८ पदे रिक्त असून केवळ ४ कर्मचारी सेवा बजावत आहेत.

पशुपालक अडचणीत; सेवा कोलमडण्याची भीती

एकीकडे शासनाकडून पशुधन संवर्धनाच्या आणि गोवंश संरक्षणाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती भलतीच आहे. १० लाखांहून अधिक जनावरांच्या लसीकरणापासून ते आपत्कालीन उपचारांपर्यंतच्या सेवा पुरवताना या अवघ्या २४ कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे.

रिक्त पदे तातडीने न भरल्यास तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, अशी जोरदार मागणी तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांतून केली जात आहे.

Advertise,……..


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!