
सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपनामुळे वाळू-वीट व्यावसायिक कर्जबाजारी!
‘हब्बनहट्टीत मलाई, तर वाळू व्यावसायिकावर उपासमारीची खाई ?’ — ॲड. ईश्वर घाडी यांचा सत्ताधाऱ्यांवर लाक्षणिक व तुफान घणाघात
खानपूर: राजू कुंभार
तालुक्याचा कणा असणाऱ्या वाळू आणि वीट उत्पादक व्यावसायिकांना पद्धतशीरपणे कर्जबाजारी आणि उद्ध्वस्त करण्याचे पाप तालुक्यातील सत्ताधारी भाजपने केले आहे. देशभक्तीचे खोटे व ढोंगी पांघरूण अंगावर घेऊन मिरवणाऱ्या ‘चमको’ नेते व कार्यकर्त्यांना गोरगरिबांच्या चूली पेटण्याशी किंवा त्यांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही, अशी लांछनास्पद परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या अत्यंत ढिसाळ कारभाराविरोधात आणि जनतेच्या रोजीरोटीवर चिखलफेक करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या निगरगट्ट भूमिकेविरोधात सोमवारी संतापाचा लाव्हा फुटला. वाळू व वीट व्यवसायावरील जाचक निर्बंध तत्काळ उठवावेत, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिवस्मारक सर्कलमध्ये तुफान चक्का जाम आंदोलन छेडण्यात आले आणि तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
हब्बनहट्टीसाठी खनिज प्रकरणी पायघड्या, मग गरिबांवरच अन्याय का?
मोर्चानंतर प्रशासनाला आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या नेत्यांना खडे बोल सुनावताना ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष तथा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी थेट सवाल केला की, “हब्बनहट्टी येथे खनिज व्यवसाय दिमाखात व सुखरूप सुरू असताना, खानापूर तालुक्यातील वाळू व्यवसायावरच कुऱ्हाड का? पट्टा जमिनीतील वाळू उपशासाठी परवानगी देताना जाचक आणि जाणीवपूर्वक वेठीस धरणाऱ्या अटी का लादल्या जात आहेत? बेळगाव ग्रामीण भागात वाळू व्यवसाय राजरोस सुरू असताना, केवळ खानापूर तालुक्यावरच आर्थिक नाकेबंदी करणारे निर्बंध का?” असा उग्र सवाल त्यांनी उपस्थित केला. वाळू उपशाच्या नावाखाली खात्या-खात्यांतून आणि अधिकाराच्या जोरावर सुरू असलेले लाचखोरी व हप्तेखोरीचे प्रकार त्वरित थांबले नाहीत, तर याद राखा, असा थेट अल्टीमेटम त्यांनी प्रशासनाला दिला.
‘चमको’ नेत्यांची पाठ फिरवण्याची लाजीरवाणी भूमिका!
आज तालुक्यावर आणि हजारो कष्टकऱ्यांवर उपासमारीचे मोठे संकट कोसळले असताना, सत्तेत वावरणाऱ्या भाजपच्या स्थानिक ‘चमको’ नेत्यांना व कार्यकर्त्यांना या जनसमस्यांचे अजिबात सोयरसुतक उरलेले नाही. प्रशासनाच्या या दुटप्पी आणि हुकूमशाही धोरणाविरोधात छातीठोकपणे रस्त्यावर येऊन या मोर्चात सहभागी होण्याचे नैतिक धाडस या सत्तेच्या लोभापायी आंधळ्या झालेल्या नेत्यांमध्ये दाखवता आले नाही, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. लोकांच्या मतांवर झोकात जगणारे हे लोकप्रतिनिधी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प बसले आहेत, असा संतप्त सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.
हजारो कुटुंबीय उद्ध्वस्त; प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?
गेल्या काही वर्षांपासून वाळू व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्यामुळे वाळू उत्पादक, वीट उत्पादक, ट्रॅक्टर मालक, वाहनचालक, बांधकाम व्यावसायिक आणि हजारो हातांवर पोट असणारे कामगार यांच्यासमोर अन्नाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सर्वसामान्यांच्या घरबांधणीचे स्वप्न धुळीस मिळाले असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मात्र डोळे झाडून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.
अधिवेशनापूर्वी निर्णय घ्या, अन्यथा ‘खानपूर बंद’चाज्वालामुखी उसळेल!
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी या जनआंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवत, गोरगरिबांच्या पोटावर मारण्याचे राजकारण तातडीने थांबवावे, अशी परखड भूमिका मांडली. तसेच, मुरलीधर पाटील यांनी खणखणीत इशारा दिला की, “आगामी अधिवेशनापूर्वी शासनाने वाळू व्यवसाय सुरळीत सुरू करण्याबाबत सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे ‘खानपूर बंद’ आंदोलन छेडले जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि ढिम्म प्रशासनची असेल!”
आता जनतेच्या या प्रचंड रोषासमोर आणि धडक इशाऱ्यासमोर झोपा काढणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले असून, निष्क्रिय राहिलेल्यांना जनता आगामी काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.
Advertise

Advertise

