कर्नाटकमधील २५ हजारांहून अधिक प्री-स्कूल्स बंद पडण्याच्या भीतीखाली; ४.५ लाख महिलांचे रोजगार धोक्यात


कर्नाटकमधील २५ हजारांहून अधिक प्री-स्कूल्स बंद पडण्याच्या भीतीखाली

४.५ लाख महिलांचे रोजगार धोक्यात

राजू कुंभार: नागुर्डा

राज्य सरकारच्या जाचक नियमांमुळे कर्नाटकातील २५ हजारांहून अधिक स्वतंत्र प्री-स्कूल्स (पूर्व-प्राथमिक शाळा) बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे सुमारे ४.५ लाख महिला शिक्षिका, आया आणि इतर कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता असल्याची भीती ‘कर्नाटक प्री-स्कूल्स कौन्सिल’ने (KCPS) व्यक्त केली आहे.

Advertise

मोठ्या शाळांना लागू असणारे नियमच आता प्री-स्कूल्सनाही लागू केले जात आहेत. यामध्ये भाड्याच्या इमारतीसाठी ३० वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार (लीज अ‍ॅग्रीमेंट), १८ बाय २० फूट आकाराची वर्गखोली, किमान २,००० चौरस फूट जागा आणि शैक्षणिक कारणासाठी जमिनीचे बिगरशेती (NA) रूपांतरण अनिवार्य करण्यात आले आहे. छोट्या शिक्षण संस्थांना या अटी पूर्ण करणे अशक्य असल्याचा आरोप कौन्सिलने केला आहे.

तसेच, शाळा नोंदणीसाठी असलेले ऑनलाइन पोर्टल व्यवस्थित काम करत नसल्याने प्रशासकीय अडचणी येत आहेत. हे स्वतंत्र प्री-स्कूल्स बंद पडल्यास, स्थानिक पातळीवर कमी खर्चात मिळणारे बालसंगोपन आणि प्राथमिक शिक्षणाचे पर्याय संपुष्टात येतील. परिणामी, नोकरी करणाऱ्या मातांवर नोकरी सोडण्याची वेळ येऊ शकते. याशिवाय, मोठ्या शिक्षण संस्थांची मक्तेदारी वाढून शुल्कात पाच पटीने वाढ होण्याची शक्यताही कौन्सिलने वर्तवली आहे.

सरकारकडे प्रमुख मागण्या:

या पार्श्वभूमीवर कौन्सिलने शिक्षण मंत्री आणि राज्य सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत:

स्वतंत्र प्री-स्कूल्ससाठी स्वतंत्र आणि सुलभ नियमावली तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी.

इमारत, भाडेकरार आणि जमीन रूपांतरणासंबंधीच्या कठोर नियमांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती द्यावी.

संस्थेच्या सोयीसाठी शाळा नोंदणीचे ऑनलाइन पोर्टल तात्काळ दुरुस्त करावे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!