काँग्रेसकडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम;  डॉ. सोनाली सरनोबत यांचा घणाघात


काँग्रेसकडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम;  डॉ. सोनाली सरनोबत यांचा घणाघात

राजू कुंभार: खानापूर
एकीकडे दुष्काळाच्या तीव्र झळांनी होरपळणारी जनता आणि दुसरीकडे महागाईचा भस्मासुर… अशा अत्यंत बिकट परिस्थितीत दूध दरवाढ आणि बस प्रवासातील भाडेवाढ लादून कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा अत्यंत तीव्र आणि घणाघाती आरोप भाजप महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. सरनोबत यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. “काँग्रेस सरकारला गरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांची कसलीही जाणीव उरलेली नाही. आधीच महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या नागरिकांवर असा अतिरिक्त आर्थिक बोजा लादणे म्हणजे निव्वळ अन्याय आहे,” असे त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांच्या नावाखाली दिशाभूल!
दूध दरवाढीचे समर्थन करताना सरकारने ‘शेतकरी हित’ हा परवलीचा शब्द बनवला आहे. यावर बोट ठेवताना डॉ. सरनोबत यांनी सरकारला थेट सवाल केला—

“वाढीव दरवाढीतील किती रक्कम प्रत्यक्ष दुग्धउत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे? आणि उर्वरित पैशांचा विनियोग सरकार कुठे आणि कशासाठी करणार आहे? याचा पारदर्शक खुलासा सरकारने आधी जनतेसमोर करावा.”

‘शक्ती योजने’चा फुगा फुटला!

‘शक्ती’ योजनेच्या नावाखाली मोफत प्रवासाची आकर्षक गॅरंटी देऊन आधी राज्याच्या तिजोरीवर अथांग आर्थिक ताण निर्माण करायचा आणि आता तोच तुटवडा भरून काढण्यासाठी अप्रत्यक्षपणे बस भाडेवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावायची, हा सरकारच्या दुटप्पीपणाचा उत्तम नमुना आहे, असा टोला त्यांनी लगावला. दिलासा देण्याची पोकळ आश्वासने देऊन सत्तेत आलेले हे सरकार प्रत्यक्ष व्यवहारात मात्र जनतेला आर्थिक गर्तेत लोटत असल्याचा घोर आरोप त्यांनी केला.

‘महिला सक्षमीकरण’ केवळ कागदावरच!

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसणे हेच काँग्रेसच्या तथाकथित ‘महिला सक्षमीकरणा’च्या दाव्यांमधील फोलपणा सिद्ध करते, अशी चपराकही त्यांनी लगावली.

शेवटी बोलताना डॉ. सरनोबत म्हणाल्या की, “महिला, गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या केवळ आकर्षक घोषणा करणाऱ्या या सरकारला सर्वसामान्यांच्या वास्तववादी प्रश्नांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. जनतेची ही लूट त्वरित थांबवून सरकारने महागाई व दुष्काळाच्या संकटातून नागरिकांना दिलासा देण्यावर गांभीर्याने भर द्यावा.”

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!