पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, मराठी शाळा वाचवा!”


“पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, मराठी शाळा वाचवा!“

 भैरू पाटील यांचे सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

खानापूर: राजू कुंभार 

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान खानापूर यांच्यावतीने ‘प्रबोधन’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन येथील प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे वाचनालयात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात काँग्रेस नेते तथा जांबोटी को-ऑपचे संचालक भैरू पाटील यांनी मराठी प्राथमिक शाळा आणि पर्यायाने मराठी भाषेच्या रक्षणासाठी पक्षीय मतभेद व राजकारण बाजूला ठेवून आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे जोरदार आवाहन केले आहे.

मराठी भाषा टिकवण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज

यावेळी बोलताना भैरू पाटील म्हणाले की, आपण सर्वजण फक्त ‘मराठी भाषा टिकली पाहिजे’ असे तोंडी म्हणत असतो, परंतु भाषा टिकवण्याच्या दृष्टीने ठोस आणि खास असे प्रयत्न कोणीही केलेले नाहीत. त्यांनी गतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, एक वर्षापूर्वी विलास बेळगावकर व स्वतः भैरू पाटील यांनी विश्वभारती क्रीडा कला संघटना यांच्या माध्यमातून आणि अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शाळांचे एसडीएमसी अध्यक्ष, मुख्याध्यापक व नागरिकांची शिवस्मारक येथे एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आमदार आणि सर्व पक्षांतील नेतेमंडळींनी तसेच तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन एक विशेष बैठक बोलवावी, अशी सूचना त्यांनी केली.

आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद; लवकरात लवकर सभा होण्याची अपेक्षा

भैरू पाटील यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपल्या मनोगतात, मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच एक सर्वसमावेशक बैठक बोलावली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता खानापूर तालुक्यातील मराठी शाळा व भाषा टिकवण्यासंदर्भात लवकरात लवकर एक मोठी सभा होईल, अशी दाट अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकाशन सोहळ्यास खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, काँग्रेस ब्लॉकअध्यक्ष ईश्वर घाडी, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, सूर्यकांत कुलकर्णी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव आबासाहेब दळवी, भाजपचे  प्रमोद कोचेरी, संजय कुबल, मल्लाप्पा मारीहळ, अर्बन बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वासुदेव चौगुले यांनी केले.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!