अमावस्येनिमित्त बाळूमामांचे दर्शन घेऊन गावी परतताना काळाचा घाला; अडकूर येथील अरुण देसाई यांचा दुर्दैवी अंत, कंटेनरचालक किरकोळ जखमी.
प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
निढोरी : मुरगूड-निढोरी मार्गावरील कागल फाट्याजवळ कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी होऊन दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळला. या भीषण अपघातात अडकूर (ता. चंदगड) येथील अरुण रामचंद्र देसाई (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरचालक शहाबाज खान हा किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण देसाई हे अमावस्येनिमित्त आदमापूर येथील श्री बाळूमामा यांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन दुचाकीवरून ते आपल्या गावी अडकूर येथे परतत असताना मुरगूड-निढोरी मार्गावरील पुलाच्या पलीकडे हा अपघात घडला. कोईमतूर येथून मुंबईतील भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या TN 52 AE 9904 क्रमांकाच्या कंटेनरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन पलटी झाला. याच वेळी बाजूने जात असलेल्या अरुण देसाई यांच्या अंगावर कंटेनर कोसळल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पलटी झालेल्या कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, मृत अरुण देसाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेमुळे अडकूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पुढील तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.

