कोल्हापूर च्या सुर्वे नगरात भीषण स्फोट


बंद बंगल्याचे मोठे नुकसान; तिघांचा शोध सुरू

कोल्हापूर प्रतिनिधी : श्री. स्वप्निल कुंभार.

कोल्हापूर शहरातील कळंबा रिंग रोडलगतच्या सुर्वे नगर परिसरात बुधवारी रात्री एका बंद बंगल्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटात घराच्या आतील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात स्फोटासाठी जिलेटिनसदृश्य स्फोटकांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जिलेटिनसदृश्य कांड्यांचे काही अवशेषही आढळून आल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे बंगल्याच्या आतील तीन भिंती कोसळल्या असून, घरातील बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला आहे.

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटापूर्वी सात ते आठ मोठे आवाज ऐकू आले. या स्फोटांची तीव्रता इतकी होती की, शेजारील घरांच्या खिडक्यांच्या काचांनाही तडे गेले. दरम्यान , परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता काळे कपडे परिधान केलेल्या व चेहऱ्यावर मास्क लावलेल्या तीन संशयित व्यक्ती बंगल्याच्या दिशेने जाताना दिसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तिघांचा शोध पोलीस घेत असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित बंगल्याबाबत घरमालकीचा वाद असल्याची चर्चा असून, त्यातूनच हा प्रकार घडविण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या स्फोटामागील नेमके कारण, त्यामागील सूत्रधार आणि वापरण्यात आलेल्या स्फोटकाचे स्वरूप याचा सर्वंकष तपास पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.


2
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!