लेखन आणि मुलाखतींतून सामाजिक कार्याला व्यासपीठ!
ग्रामीण भागातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत डिजिटल विश्वात उमटवला वेगळा ठसा.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्नील कुंभार.
ग्रामीण मातीतून पुढे येत आधुनिक डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणारे सातवणे (ता. चंदगड) येथील युवा कंटेंट क्रिएटर आणि लेखक श्रावण गुरव यांनी आपल्या कार्यातून डिजिटल क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. कल्पक आशय, अभ्यासपूर्ण लेखन आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी साधलेला संवाद ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये ठरत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांचे अनुभव आणि त्यांच्या कार्याची ओळख लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करीत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील शेतकरी, उद्योजक, सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे कार्यकर्ते आणि व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या संघर्षमय प्रवासातील प्रेरणादायी पैलू ते समोर आणत आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना व्यापक डिजिटल व्यासपीठ मिळत आहे.
. “झाडांच्या सावलीत माणुसकीचा गारवा असतो, पक्ष्यांच्या किलबिलाटात जगण्याचा आनंद असतो आणि निसर्गाच्या सहवासात जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो.” – श्रावण गुरव.

लेखन क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली आहे. सामाजिक वास्तव, ग्रामीण भागातील समस्या, पर्यावरण संवर्धन, व्यवसायातील संधी, उद्योजकतेचा प्रवास आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विषयांना त्यांच्या लेखणीतून स्थान मिळत आहे. एखाद्या विषयाकडे केवळ माहिती म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक आशय व सकारात्मक बदलाची शक्यता वाचकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
बदलत्या काळात डिजिटल माध्यमे ही समाजातील विचार, अनुभव आणि कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची साधने बनली आहेत. याच माध्यमांचा विधायक वापर करत नव्या पिढीसमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणण्याचे काम श्रावण गुरव करीत आहेत. ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा हा डिजिटल प्रवास आगामी काळात अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

