
विश्रांतवाडी जाळपोळ प्रकरणी कान्सुली व मनसापूर येथील दोघांना अटक
दुचाकी जाळपोळ प्रकरणाचा उलगडा
राजू कुंभार: नागुर्डा
विश्रांतवाडी (नागुर्डा) परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकी पेटवून देणे आणि ऊस पिकाला आग लावण्याच्या खळबळजनक प्रकरणाचा खानापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी कान्सुली येथील गौतम अमृत शिपूरकर आणि मनसापूर येथील त्याचा साथीदार सॅमीवेल (शावेल)मेनेजिस या दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
काय आहे नेमकी घटना?
११ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्री (१२ नोव्हेंबरच्या पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास) विश्रांतवाडी (नागुर्डा) येथील जोतिबा (भय्या) राजू चव्हाण यांच्या घराच्या आवारात उभी असलेली दुचाकी पेटवून देण्यात आली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याच रात्री जोतिबा चव्हाण यांच्या शेतातील ऊस पिकालाही आग लावण्याचा प्रकार घडला. सुदैवाने ही आग संपूर्ण शेतात पसरली नाही; अन्यथा परिसरातील अंदाजे ५०० ते ८०० टन उसाचे मोठे नुकसान झाले असते.
मोठा अनर्थ टळला
मध्यरात्री प्रवास करणाऱ्या काही युवकांनी दुचाकीला लागलेली आग पाहून तात्काळ गावकऱ्यांना कळवले. ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा धोका टळला. आग आणखी भडकली असती, तर शेजारील नागेश देव सोसायटी आणि बाजूच्या सायकल दुकानालाही धोका निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती.
जुन्या वादातून जाळपोळ?
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी संशयित आरोपी गौतम शिपूरकर याने जुना राग मनात धरून जोतिबा चव्हाण यांना लोकांसमोर धमकी दिली होती. याच वैमनस्यातून आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पाळत ठेवून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांची कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निरंजन व पथकाने घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदवला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान गौतम शिपूरकर आणि सॅमीवेल (शावेल) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुरुवारी सायंकाळी विश्रांतवाडीसह संशयितांनी आग लावण्याच्या उद्देशाने पेट्रोल व इतर साहित्य जमवलेल्या ठिकाणांचा व ऊस पिकाचा पंचनामा करण्यात आला.
चोर आणि समाजकंटकांचे धाबे दणाणले
पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाई मुळे समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत. अलीकडे नागुर्डा, मोदेकोप काटगळी परिसरात गावठी बंदुका, चंदन चोरी, गांजा व चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून अन्य काही प्रलंबित गुन्हे या अनुषंगाने उघड होण्याची शक्यता आहे.
Advertise

Advertise

