खानापूर काँग्रेसचा प्रवास: पहिले आमदार अरगावी ते डॉ. निंबाळकर!


 

पहिले आमदार अरगावी ते डॉ. निंबाळकर! पक्ष बळकटीसाठी आता सक्षम नेतृत्वाची गरज

राजू कुंभार: खानापूर
सत्ता असो वा नसो, पक्षाची मूळ विचारधारा तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संघटन टिकवून ठेवण्यात तालुका (ब्लॉक) अध्यक्षांची भूमिका अत्यंत कळीची असते. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाया हा त्याच्या विचारधारेवरच भक्कम उभारी घेत असतो. कर्नाटकातील सीमावर्ती खानापूर मतदारसंघाचा राजकीय पट पाहिला, तर १९५२ मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयापासून ते २०२६ मधील सद्यस्थितीपर्यंत काँग्रेसच्या वाटचालीत अनेक मोठे राजकीय चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.
१९५२ चा ऐतिहासिक पाया आणि सहकार क्षेत्रातील योगदान
स्वतंत्र भारताच्या १९५२ मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे बसप्पा सिद्धलिंगप्पा आरगावी (बसप्पन आरगावी) यांनी खानापूर मतदारसंघातून विजय मिळवून काँग्रेसची पाळेमुळे रोवली होती. त्यांनी केवळ राजकीय सत्ता मिळवली नाही, तर नांदगड ग्रामीण शिक्षण संस्था (महात्मा गांधी हायस्कूल) आणि खानापूर तालुका कृषी उत्पन्न सहकारी संस्थेची स्थापना करून सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. पुढे १९६८ ते १९७४ या काळात त्यांनी कर्नाटक विधान परिषदेतही प्रतिनिधित्व केले.

ब्लॉक काँग्रेसची परंपरा आणि संघटनात्मक धुरा
आरगावी यांच्यानंतर पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदाची परंपरा सुरू झाली. १९७५ मध्ये खानापूरचे नगराध्यक्ष तथा मलप्रभा सहकार साखर कारखान्याचे संचालक नाना पाटील हे पहिले ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बनले.
त्यानंतर मष्णू अंबडगट्टी, बी. डी. हिरेमठ, रफिक खानापुरी, ॲड. ईश्वर घाडी, सी. बी. अंबोजी, महेश पाटील, अशोक अंगडी, देमाण्णा बसरीकट्टी, महादेव कोळी, मधू कवळेकर, पुन्हा ॲड. ईश्वर घाडी आणि महंतेश राऊत यांनी विविध कालखंडांत अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत पक्ष जिवंत ठेवला.
भाषिक राजकारण आणि प्रदीर्घ ‘वनवास‘ (१९५७ – २०१३)
१९५२ च्या पहिल्या विजयानंतर सीमाभागातील भाषिक वादामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांचे या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण झाले.

१९५७: अपक्ष उमेदवार लक्ष्मण बिरजे यांनी बसप्पन आरगावी यांचा पराभव केला.

दशकांची पीछेहाट: पुढे नीलकंठराव सरदेसाई, वसंतराव पाटील, अशोक पाटील, दिगंबर पाटील आणि अरविंद पाटील यांसारख्या नेत्यांच्या लाटेमुळे काँग्रेसचा गड ढासळला.
प्रमुख लढवय्ये: या प्रदीर्घ काळात मसनू फकिराप्पा अंबडगट्टी (१९८३) आणि रामचंद्र कलाल (१९८५) यांनी लढत दिली. आधुनिक काळात रफिकखानापुरी यांनी २००८ (२४,६३४ मते) आणि २०१३ (२०,९०३ मते) च्या निवडणुकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. २००८ मध्ये भाजपनेही येथे पहिल्यांदा विजय मिळवला होता.

६६ वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन: डॉ. अंजली निंबाळकर
तब्बल ६६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अंजली निंबाळकर यांनी ३६,६४९ मते मिळवून खानापूरमध्ये काँग्रेसचे ऐतिहासिक पुनरागमन घडवून आणले. त्यांनी भाजप आणिसमिती समर्थित उमेदवारांना धूळ चारत काँग्रेसची सत्ता प्रस्थापित केली. या विजयात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानासोबतच निंबाळकर यांची मोठी राजकीय ताकद निर्णायक ठरली.
मात्र, २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसला हा गड टिकवता आला नाही. ३७,२०५ मते मिळवूनही डॉ. निंबाळकर यांना भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

सद्यस्थिती, आव्हाने आणि नव्या अध्यक्षांची शोधमोहीम
२०२३ मधील पराभवानंतर मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी विस्कळीतता पाहायला मिळाली. त्यातच पक्षाने डॉ. निंबाळकर यांच्यावर राष्ट्रीय सचिवाची जबाबदारी सोपवून इतर राज्यांच्या संघटनात्मक बांधणीसाठी पाठवल्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक पातळीवर विचारधारा पोहोचवण्यात पदाधिकारी कमी पडले. परिणामी, सरकारनियुक्त पदे वगळता स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकनियुक्त पदांवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे अस्तित्व फिके पडले.

सध्या बेळगाव जिल्हा काँग्रेसचे नूतन अध्यक्ष बसवराज सिग्गावी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तालुका, जिल्हा व ग्राम पंचायत निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर, उद्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष तालुक्यातील इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार आहेत. पक्षातील विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवणारा, आक्रमक रणनीती आखणारा आणि आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची विजयाची कमान उंचावणारा ‘प्रभावी आणि सक्षम’ ब्लॉक अध्यक्ष खानापूर काँग्रेसला मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!