चंदगड तालुक्यातील १७ वर्षीय मुलाचे अपहरण
चंदगड : स्वप्नील हणमंत कुंभार
चंदगड तालुक्यातील एका गावातून १७ वर्षे ४ महिन्यांच्या अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या नोंदीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता मुलगा जंगमहट्टी गावातून बेपत्ता झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही.
बेपत्ता मुलाचे नाव हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७ वर्षे ४ महिने) असून तो जंगमहट्टी येथील रहिवासी आहे. त्याची आई योगिता प्रकाश हुंदळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून मुलाला पळवून नेले, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मुलाचे वर्णन:
हर्षदची उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ असून त्याने आकाशी रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅकपँट परिधान केली होती. त्याच्या पायात काळा दोरा व खाकी रंगाचे चप्पल असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. मुलाच्या डाव्या पायाच्या पेंडरिवर जखमेचा व्रण असून तो मराठी व हिंदी भाषा बोलतो.
या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही याबाबत महिती असल्यास चंदगड पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



