मारहाण, शिवीगाळ व दागिने काढून घेतल्याचा आरोप; चंदगड पोलिसांत तक्रार दाखल.
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला मारहाण तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व नणंद अशा तिघांविरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत सौ. सुवर्णा सुरेश कांबळे (वय 35, रा. मंजरे-शिरगाव, ता. चंदगड) सध्या रा – करंजगांव. यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीवरून त्यांचे पती सुरेश गोपाळ कांबळे, सासू रुक्मिणी गोपाळ कांबळे व नणंद गीता ज्ञानेश्वर कांबळे (रा. पाटणे, ता. चंदगड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिलेचा विवाह २०११ मध्ये आरोपी पतीसोबत हिंदू रितीरिवाजानुसार झाला आहे. विवाहानंतर विविध ठिकाणी वास्तव्यास असताना पतीसह सासू व नणंद यांनी संगनमताने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच पतीने मारहाण केल्याचा, तर अन्य आरोपींनी अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेऊन तिला घरातून बाहेर काढल्याचे तसेच तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या स्त्रीधनातील वस्तू विकून टाकल्याचे व इथेच राहायचे असेल तर ५.००.०००/- रुपये तुझा बापाकडून घेऊन ये. अशी जबरदस्ती करण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपींकडून त्रास सहन होत नसल्याने विवाहितेने चंदगड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉं. २०७९ चौगुले करीत आहेत.

