शहीद हवालदार नामदेव गावडे अनंतात विलीन.


शासकीय इतमामात व ग्रामस्थांच्या भावुक वातावरणात अंत्येष्टी.

उपसंपादक : श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड,आजरा,  गडहिंग्लज)

चंदगड:      सैन्यदलात कार्यरत असताना देशाचे रक्षण करताना वीरमरण आलेले हवालदार नामदेव आनंदा गावडे यांना इनाम म्हाळुंगे (ता. चंदगड) येथे अत्यंत शोकाकुल आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. गुरुवारी (दि. २०) अमृतसर येथे हवालदार गावडे यांचे निधन झाले होते. अमृतसरहून विमानाने त्यांचे पार्थिव प्रथम पुण्यात आणले गेले आणि तेथून रुग्णवाहिकेने रविवारी त्यांच्या मूळ गावी, इनाम म्हाळुंगे येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचा मुलगा यश याने अग्नी दिली.

​ग्रामस्थांकडून गावच्या सुपुत्राला अश्रूपूर्ण श्रद्धांजली 

गावात पार्थिव पोहोचताच दुपरी दोन वाजता सुशोभित ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून अंत्ययात्रा सुरू झाली. घराघरांसमोर सुवासिनींनी नम्रपणे पार्थिवाचे औक्षण केले. याप्रसंगामुळे गावात शोक आणि देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान असा अनोखा संगम पाहायला मिळाला. “भारत माता की जय” आणि “हवालदार नामदेव गावडे अमर रहे” या घोषणांनी अवघा परिसर गजबजून गेला.

​चंदगड तालुक्यावर शोककळा

आपल्या लाडक्या जवानाला गमावल्याचे दुःख आणि त्याने देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान, अशा संमिश्र भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. हवालदार गावडे यांच्या निधनाने संपूर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांचा हा त्याग आणि कर्तव्यनिष्ठा पुढील पिढ्यांना नेहमीच राष्ट्रसेवेची प्रेरणा देत राहील.

​आदरांजली देणेसाठी तालुक्यातून मान्यवरांची उपस्थिती

अंतिम संस्काराच्या वेळी गोपाळराव पाटील, सभापती विलास नाईक, निखिल पाटील, भारती पाटील, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, पंचायत समिती सदस्या मनस्विनी कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

​हवालदार नामदेव गावडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!