फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; चंदगड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद.
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड: तालुक्यातील कोदाळी परिसरात असलेल्या हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळील धबधब्यात पाय घसरून १८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मयत तरुण साई सुभाष शापुरकर (रा. पाईपलाईन रोड, विजयनगर-हिंडलगा, जि. बेळगाव) हा आपल्या कुटुंबीयांसह सहलीसाठी येथे आला होता.
ही घटना २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. वर्दीदार श्रीमती शुभांगी सुभाष शापुरकर (वय ४८, रा. विजयनगर-हिंडलगा, बेळगाव) या त्यांच्या नातेवाईकांसह कोदाळी येथील हॉटेल ग्रीन व्हॅलीच्या धबधब्यावर गेल्या होत्या. त्यावेळी धबधब्याच्या खालच्या बाजूला असलेल्या दगडावर उभे राहून साई हा फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता.
फोटो काढताना अचानक दगडावरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट पाण्यात कोसळला. पाण्याच्या खोलीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली.
या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार चंदगड पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ७२/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ २९४ जाधव हे या घटनेचा पुढील तपास करत असून, त्यांना मदतीसाठी पोहेकॉ ९७० राजीगरे यांना रवाना करण्यात आले आहे.

