गृहलक्ष्मी’ योजनेच्या पैशांसाठी नातवानेच केला आजीचा खून


गृहलक्ष्मी’ योजनेच्या पैशांसाठी नातवानेच केला आजीचा खून

बेळगाव : ‘गृहलक्ष्मी’ योजनेचे पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पोटच्या नातवानेच आपल्या ७८ वर्षीय आजीचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीच्या बॅकवॉटरमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील अरळीकट्टी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली आहे.

हम्मांना बाळप्पा सनदी (वय ७८, रा. अरळीकट्टी, ता. हुक्केरी) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर भीमप्पा रामप्पा सनदी (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नातवाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हम्मांना या गेल्या १० नोव्हेंबर रोजी पाच्छापूर येथील आठवडी बाजारात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जिनराळ गावाजवळ असलेल्या घटप्रभा नदीच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन गोणपाटांमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

तपासात धक्कादायक बाबी उघड

मृत वृद्धेची मुलगी भीमन्ना परसप्पा ईरनट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यमकानमरडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर हा खून स्वतःच्या नातवानेच केल्याचे निष्पन्न झाले. वृद्धेला मिळणाऱ्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या पैशांतून आपल्यालाही वाटा द्यावा, यासाठी आरोपी गेल्या काही वर्षांपासून आजीकडे तगादा लावत होता.

१० नोव्हेंबर रोजी आरोपीने आजीला दुचाकीवरून गवी सिद्धेश्वर डोंगरावर नेले. तिथे पुन्हा पैशांवरून दोघांत वाद झाला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना खाली ढकलून गळा दाबला आणि दोरीने आवळून त्यांचा खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

खून केल्यानंतर मृतदेह डोंगरावरच ठेवून आरोपी पाच्छापूरला गेला आणि तिथून दोन गोणपाटे घेऊन आला. त्याने आजीकडील २,३०० रुपये रोख रक्कम काढून घेतली आणि मृतदेह गोणपाटात भरला. रात्री दुचाकीवरून मृतदेह जिनराळ गावाजवळील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये नेऊन, गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या काढून घेतल्या आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगड बांधून मृतदेह पाण्यात फेकून दिला, अशी कबुली आरोपीने तपासात दिल्याचे गुरुवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Advertise

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!