साखर कारखान्यांना सक्त नोटिसा: अपघातास कारणीभूत ठरल्यास व्यवस्थापनावरही होणार कायदेशीर कारवाई.
चंदगड प्रतिनिधी: श्री. स्वप्निल कुंभार.
चंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊस वाहतूक हंगामादरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. दरवर्षी या कालावधीत ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ट्रकच्या धडकेमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याने, यंदा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने एक विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत परिसरातील तिन्ही साखर कारखान्यांना अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर कायदेशीररीत्या रिफ्लेक्टर बसवणे, तांत्रिक सुरक्षा सुनिश्चित करणे आणि सर्व रहदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश कारखान्यांना देण्यात आले आहेत.
कारखान्यांच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा:
फक्त वाहनचालकच नव्हे, तर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही थेट कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या ट्रॅक्टर किंवा ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वा अंधाऱ्या वेळी अपघात घडला, तर उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर वाहनचालकासोबतच संबंधित कारखान्याच्या जबाबदार शेती अधिकाऱ्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पोलिसांनी भरला आहे.
प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पोलिसांची कारवाई :
केवळ कागदी नोटिसांवर न थांबता, चंदगड वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. ज्या वाहनांवर रिफ्लेक्टर नाहीत, अशा वाहनांना जागेवरच रिफ्लेक्टर बसवून दिले जात आहेत. तसेच, वाहनमालक आणि चालकांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देऊन जनजागृतीही केली जात आहे.

कर्णकर्कश डीजे आणि ‘टेम्पर रेकॉर्डर’वर विशेष नजर:
रस्त्यावरील सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटकांवरही पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बेकायदेशीरपणे मोठ्या क्षमतेचे साऊंड सिस्टीम (डीजे) आणि ‘टेम्पर रेकॉर्डर’ लावून कर्णकर्कश गाणी वाजविणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशा प्रकारच्या ध्वनिप्रदूषणामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन होणारे अपघात टाळणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
पोलिसांचे आवाहन:
“अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच तो रोखणे हे आमचे प्राधान्य आहे. नागरिकांचा जीव सुरक्षित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही,” असे स्पष्ट करत चंदगड पोलीस प्रशासनाने सर्व शेतकरी, वाहनमालक, चालक व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

