प्रभारींच्या खुर्चीवर खानापूरचा कारभार रामभरोसे!
खानापूर: राजू कुंभार
तालुका प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आणि दुर्गम असलेल्या खानापूर तालुक्याचा प्रशासकीय कारभार अक्षरशः रामभरोसे चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांना साध्या प्रशासकीय सेवा मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत असताना, दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यासाठी आमदारांकडून शर्यती आणि स्पर्धांवर बक्षिसांची खैरात केली जात असल्याचा संतप्त संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आपली राजकारणातील चढाओढ बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करावा आणि तातडीने कायमस्वरूपी सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
तालुक्यातील विविध विभागांमधील अनागोंदी कारभाराची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
महिला आणि बालविकास (CDPO) विभाग:
खानापूर तालुका सीडीपीओ म्हणून के. विक्रम हे काम पाहत आहेत. त्यांच्याकडे बेळगाव ग्रामीण अंगणवाडी अधिकारी तसेच बाल भवनचा (सर्टिफाइड स्कूल) कार्यभारही सोपवण्यात आला आहे. एकाच अधिकाऱ्यावर तीन कार्यालयाचा ताण असल्यामुळे तालुक्यातील ३५० अंगणवाड्यांच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. अंगणवाडी कर्मचारी व सेविकांना आपल्या कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत.हे अधिकारी मूळचे केवळ पर्यवेक्षक (सुपरवायझर) असताना त्यांच्यावर एवढा मोठा कार्यभार दिल्याने विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी
तालुका पंचायत कार्यालयात गेल्या तब्बल दोन वर्षांपासून कायमस्वरूपी अधिकारीच नाही, ज्यामुळे ग्रामीण भागातील विविध योजना राबवण्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
सध्या तालुका पंचायतीचे प्रभारी अधिकारी म्हणून रमेश मैत्री काम पाहत आहेत. त्यांची मूळ नेमणूक जेजेएम (JJM) पाणीपुरवठा अधिकारी म्हणून असताना, ता. पंचायत प्रभारी म्हणून ते दोन वर्षे कारभार पाहत असल्याने दोन्ही विभागांचे कामकाज कोलमडले आहे.
तहसीलदार:
खानपूरचे तहसीलदार दुडाप्पा कोमार यांची प्रांताधिकारी म्हणून हुबळी येथे नियुक्ती झाल्यामुळे हे महत्त्वपूर्ण तहसीलदारपद पूर्णपणे रिक्त झाले आहे.
प्रशासनाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी महसूल विभागाचा दांडगा अनुभव असलेल्या सक्षम अधिकाऱ्याची या ठिकाणी तातडीने नेमणूक करणे नितांत गरजेचे आहे.
गट शिक्षणाधिकारी BEO
तालुका गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा मे महिन्यात निवृत्त झाल्यानंतर, जून महिन्यापासून मंजुनाथ हत्ती हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. हत्ती यांची मूळ नियुक्ती बीआरसी अधिकारी म्हणून असून, त्यांच्याकडे दोन कार्यालयांचा पदभार असल्यामुळे कुठेही योग्य नियोजन होत नाही. परिणामी, खानापूर तालुक्यातील शिक्षणाचा बोजवारा उडाला असून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
PDO पंचायत विकास अधिकारी
अनेक ग्रामपंचायतींमध्ये पूर्ण वेळ PDO नाहीत त्यामुळे एका PDO वर दोन दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार देण्यात आला आहे .परिणामी ग्रामपंचायतच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
तहसीलदार, तालुका पंचायत, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये पूर्णवेळ आणि सवलतशीर अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांमधून दिला जात आहे.
ADVERTISE

Advertise


