जटगे परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना यश
पांडा नदीवर 10 कोटींचे 5 बॅरेज कम ब्रिज मंजुरीच्या मार्गावर
प्रशांत नांदोडकर (जटगे)
यावर्षी पाऊस कमी झाल्याने जटगे परिसरातील शेतकऱ्यांपुढे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जटगे येथील श्री. सागर पाटील व इतर शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. पांडा नदीवर 5 ठिकाणी बॅरेज कम ब्रिज बांधण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे शिफारस केली आहे.
कर्नाटक सरकारच्या सन्न नीरावरी व भूजल अभिवृद्धी विभाग, उपविभाग बेळगाव यांच्या वतीने दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी हे पत्र कार्यकारी अभियंत्यांना पाठवण्यात आले आहे. श्री. सागर पाटील व इतर शेतकऱ्यांनी दि. 09 ऑक्टोबर 2026 रोजी यासाठी अर्ज केला होता.
कुठे-कुठे होणार कामे? प्रत्येकी 2 कोटी, एकूण 10 कोटी रुपये
1. पांद रस्ते जवळील पांडा नदीवर – 200 लाख
2. जटगे – शिंपेवाडी आडी जवळील पांडा नदीवर – 200 लाख
3. गुरुवाळ सर्व्हे नं. 6/4 र जवळ – 200 लाख
4. कामत सर्व्हे नं. 14/1 जवळ – 200 लाख
5. सिद्धापूर जवळील पांडा नदीवर – 200 लाख
अशा एकूण 5 कामांसाठी प्रत्येकी 200 लाख रुपये याप्रमाणे एकूण 10 कोटी रुपयांच्या कामांची शिफारस करण्यात आली आहे.
यावर्षी पाऊस कमी – त्यामुळे या उपक्रमाचा बराच फायदा होणार
यावर्षी पावसाने ओढ दिल्याने नदी-नाल्यांमधील पाणी लवकर आटले आहे. विहिरी, बोअरवेलची पातळी खालावली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत हे बॅरेज कम ब्रिज वरदान ठरणार आहेत.
या बॅरेजमुळे पांडा नदीचे पाणी अडवून ठेवले जाणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढणार आहे, विहिरींना पाणी लागणार आहे, जनावरांना बारमाही पाणी मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामातही पिके घेता येणार आहेत.
शिवाय बॅरेज कम ब्रिजमुळे दोन्ही बाजूच्या गावांना जोडणारा पक्का रस्ता तयार होणार आहे. पावसाळ्यात पांडा नदीला पूर आला तरी गावांचा संपर्क तुटणार नाही. शेतमाल वाहतूक, शाळकरी मुले, रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या कामांमुळे जटगे, शिंपेवाडी, हलसाल परिसरातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ही कामे लवकरात लवकर मंजूर करून सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
Advertise

Advertise


