खानापूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व; समिती, काँग्रेस ‘बॅकफूट’वर?


खानापूर तालुक्यात भाजपचे वर्चस्व; समिती, काँग्रेस ‘बॅकफूट’वर?

हलगेकरांची रणनीती की पाटलांचा पॅटर्न चालणार?

आमदारकीचे तिकीट फिक्स करणारी परीक्षा

विशेष वृत्त : राजू कुंभार 

जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात भाजपसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून, यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस बॅकफूटवर राहतील, असा थेट तर्क राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. नंदगड, लोंढा, पारिश्वाड, कक्केरी आणि जांबोटी या जिल्हा पंचायत मतदारसंघांसह तालुका पंचायतीच्या २० जागांपैकी १२ हून अधिक जागांवर भाजप बाजी मारेल, असे चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, समितीचा पारंपारिक गड मानल्या जाणाऱ्या गर्लगुंजी जिल्हा पंचायत मतदारसंघात समिती आपला गड राखणार की तिथेही धक्का बसणार, याबाबत तीव्र शंका व्यक्त केली जात आहे.
विविध राजकीय घडामोडींमुळे समिती आणि काँग्रेस दोन्ही चोहोबाजूने अडचणीत सापडले असून, यामुळे खानापूर तालुक्यातील प्रत्येक विभागात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

आमदारकीची ‘फायनल टेस्ट’; खानापुरात भाजपच्या तीन गटांत छुपा ‘गेम प्ले’! आमदार विठ्ठल हलगेकरांचा गेम बिघडवण्यासाठी अंतर्गत ‘मास्टरप्लॅन’?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ZP, TP आणि ग्रामपंचायत) निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक सत्ता मिळवण्याची लढाई राहिलेली नसून, ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपाची ‘मुख्य परीक्षा’ ठरणार आहे. गेल्या निवडणुकीतील मतांचा घसघशीत टक्का आणि पक्षांतर्गत काम पाहता विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक वर्तवली जात आहे. मात्र, हीच शक्यता धुळीस मिळवण्यासाठी तालुका भाजपत सध्या पडद्यामागून ‘ऑपरेशन आमदारकी’ शिजत असून, अंतर्गत शीतयुद्धाचा भडका उडाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

निवडणुका स्थानिक, पण नजर आमदारकीवर!
तालुक्यात भाजपचे वर्चस्व सिद्ध करण्याची मुख्य जबाबदारी आमदार हलगेकरांच्या खांद्यावर आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील भाजपची कामगिरीच हलगेकरांचे राजकीय भवितव्य ठरवणार आहे. परंतु, पक्षाला जिंकवण्यापेक्षा “आमदारांचा परफॉर्मन्स कसा बिघडवायचा आणि त्यांचे रेटिंग कसे खाली आणायचे?” यावरच पक्षांतर्गत विरोधकांचा अधिक डोळा असल्याचे चित्र आहे.
भाजपमध्ये तीन गट; पक्षापेक्षा ‘आपलाच माणूस’ हवा!
तालुका भाजपमध्ये सध्यातरी उघडपणे नाही, पण अतिशय अदृश्य आणि घातक मार्गाने तीन वेगवेगळे गट सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या झेडपी आणि टीपी निवडणुकांमध्ये अधिकृत भाजप उमेदवाराला निवडून आणण्याऐवजी, आपापल्या मर्जीतील आणि निष्ठावंत उमेदवारांना कसे निवडून आणता येईल, यासाठी पक्षांतर्गतच गनिमी कावा खेळला जात आहे. जर हलगेकरांच्या काळात पक्षाचा परफॉर्मन्स खालावला, तर त्याचा थेट फटका त्यांच्या आगामी उमेदवारीला बसू शकतो, असा हिशोब यामागे बांधला जात आहे.

कुणाची भूमिका ठरणार निर्णायक?

या राजकीय समीकरणांच्या पटावर सध्या चार प्रमुख चेहरे अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत:
बसवराज सानीकोप (तालुका अध्यक्ष): संघटनात्मक ताकद कोणाच्या पारड्यात टाकतात?
अरविंद पाटील (माजी आमदार): स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काय चाल खेळणार?
प्रमोद कोचेरी व संजय कुबल: आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना ताकद देऊन कोणाचा डाव साधणार?
या नेत्यांच्या बंद दाराआड होणाऱ्या हालचालींवरच खानापूर भाजपचे भवितव्य आणि आमदार हलगेकरांची उमेदवारी टिकणार की डगमगणार, याचा फैसला होणार आहे.

समितीची ‘घराणेशाही’ आणि अपरिहार्य पडझड?
मध्यवर्ती समितीच्या जुन्या आणि कुचकामी धोरणावरही या निमित्ताने कडाडून ताशेरे ओढले जात आहेत. ‘आपला तुपाला आणि भाऊबंदकीतच उमेदवारी वाटायची’ ही समितीची जुनी आणि ठराविक चौकटवादी निती या निवडणुकीत पूर्णपणे सपशेल फेल ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि विशिष्ट वर्गापुरते सीमित राहिलेले तिकीट वाटप समितीला यंदा भारी पडण्याची दाट शक्यता आहे.

डॉ. अंजली निंबाळकर यांची भूमिका ठरणार गेमचेंजर!
या सर्व राजकीय चढाओढीत काँग्रेस पक्षाचे पारडे जड करण्यासाठी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून आहे. जर डॉ. अंजली निंबाळकर यांनी आगामी निवडणुकांकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन सूत्रे आपल्या हातात घेतली, तर काँग्रेस पक्ष आपल्या कमकुवत लोकमतावर मात करत थेट दुसऱ्या क्रमांकावर मजल मारू शकतो, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

थोडक्यात काय तर…
आगामी स्थानिक निवडणुका भाजप विरुद्ध विरोधक अशी कमी आणि ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशीच जास्त रंगण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत रदबदली, छुप्या युती आणि ‘काटा मारो’ राजकारणामध्ये आमदार विठ्ठल हलगेकर आपला गड राखतात की पक्षांतर्गत विरोधक त्यांच्यावर मात करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.काँग्रेस-समितीची जुगलबंदीमुळे खानापूर तालुक्यातील आगामी निवडणुका अतिशय रंगतदार आणि चुरशीच्या होणार यात शंका नाही!

Advertise


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!