
लाखाचे १ लाख ३० हजार करण्याचे आमिष अन् पुढे थेट २.६८ कोटींची थरारक लूट
राजू कुंभार: खानापूर
पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नातेवाइकांकडून तब्बल २.६८ कोटी रुपये गोळा केले आणि त्यानंतर थेट कट रचून त्याच रकमेवर डल्ला मारल्याचा थरारक प्रकार मूडलगी तालुक्यात उघडकीस आला आहे! डोळ्यात मिरचीपूड फेकून आणि दोरीने मारहाण करत ही लुटालूट करण्यात आली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार भाचा चिदानंदसह सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे!
अशी घडली थरारक घटना:
मूडलगी तालुक्यातील संगणकेरी येथील चिदानंद सिद्धारूढ कुरबेट याने १ लाख रुपये दिल्यास अवघ्या काही दिवसांत १ लाख ३० हजार रुपये परत मिळतील, असे जोरदार आमिष दाखवले होते. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याचा मामा चन्नबसप्पा आणि अन्य तक्रारदारांनी नातेवाइकांकडून कसेबसे मिळून तब्बल २ कोटी ६८ कोटी रुपये गोळा केले.
३० ऑक्टोबर रोजी ही मोठी रक्कम बीरप्पा वनसन्नी यांच्या शेडमध्ये आणण्यात आली होती. रात्री ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास जेव्हा सर्वजण ही रोकड मोजत बसले होते, तेव्हा अचानक संजू अरभावी, राजाराम माळ्यागोळ, रमेश माळ्यागोळ, विठ्ठल माळ्यागोळ, प्रकाश मेळवणकी, राघवेंद्र कोप्पद, रामाप्पा तळवार आणि मारुती अरभावी यांनी त्या शेडमध्ये एन्ट्री केली! त्यांनी थेट चिदानंदच्या मामाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली, त्यांना दोरीने बेदम मारहाण केली आणि पाच बॅगांमध्ये भरलेले पैसे घेऊन अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली!
पोलिसांची धडाकेबाज कारवाई:
मूडलगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि गोकाकचे डीवायएसपी रवी डी. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश बैकोड व त्यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली. तपासादरम्यान जो प्रकार समोर आला, तो पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला; कारण हा सगळा कट बाहेरच्या कोणी नव्हे, तर खुद्द चिदानंदनेच आपल्या मामाला लुटण्यासाठी रचला होता!
पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच चिदानंदसह सात जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून २ कोटी ३९ लाख रुपये रोख, दोन दुचाकी आणि एक कार जप्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात रजेवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची भूमिकाही संशयास्पद असल्याचे समोर आले असून, पोलीस प्रमुखांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या पैशांच्या दुप्पट करण्याच्या कसल्याही फसव्या आमिषांना नागरिकांनी बिलकूल बळी पडू नये, असे सक्त आवाहन पोलिसांनी केले आहे.
Advertise


